Maha Kumbh Stampede : प्रयागराज : उत्तर प्रदेशमधीलप्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर आज (बुधवार) मौनी अमावस्येला अमृत स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले आहेत. दरम्यान, काल रात्रीच्या सुमारास संगमावर गर्दी इतकी मोठी झाली. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. या चेंगगरीत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे अमृत स्नान आहे. यानिमित्त मोठ्या संख्येने संगमावर लोक आले आहेत. यावेळी गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. संगम किनाऱ्यावर रात्री २ वाजताच्या सुमारास ही चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना याठिकाणी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकांद्वारे महाकुंभ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर महाकुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेला अमृत स्नान थांबवण्याचे आवाहन केले आहे. महाकुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी यांना आखाड्यांचे अमृत स्नान सध्या तरी थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर हे अमृत स्नान सध्या तरी थांबवण्यात आले आहे. तसेच, सर्व आखाडे आपल्या छावण्यांमध्ये परतत आहेत. त्याच वेळी, आखाड्यांच्या विशेष मार्गांनी सामान्य लोकांना बाहेर काढले जात आहे.
दरम्यान, प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याची सुरूवात झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक प्रयागराजला गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमावर येत आहेत. सरकारचा अंदाज आहे की, यावर्षीच्या महाकुंभमेळ्याला ४० कोटीहून अधिक लोक भेट देणार आहेत.
वसंत पंचमीला स्नान करण्यासाठी या - रवींद्र पुरी "जी घटना घडली, त्याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे. आमच्यासोबत हजारो भाविक होते. लोकांचा विचार करून आज आखाडे स्नानात सहभागी होणार नाहीत, असा आम्ही निर्णय घेतला आहे. मी लोकांना आजच्या ऐवजी वसंत पंचमीला स्नान करण्यासाठी येण्याचे आवाहन करतो. ही घटना घडली कारण भाविकांना संगम घाटावर पोहोचायचे होते. त्यामुळे भाविकांना आवाहन करतो की, त्यांनी पवित्र गंगा जिथे दिसेल तिथे स्नान करावे", असे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी म्हटले आहे.