Maha Kumbh Mela 2025 Airfare Rate News: तब्बल १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी भाविक प्रयागराज येथे पोहोचले. मकर संक्रांतीपासून सुरू झालेला महाकुंभमेळा महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. आतापर्यंत तब्बल ४५ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभमेळ्यात हजेरी लावली. महाशिवरात्रीपर्यंत कुंभमेळा असल्यामुळे अद्यापही लाखो भाविक प्रयागराज येथे रेल्वे, विमान, रस्ते या तीनही मार्गांनी पोहोचत आहेत. परंतु, प्रयागराज येथे जाण्यासाठी विमानाच्या तिकीटदराचा आकडा अवाक् करणारा आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने विमान कंपन्यांना, वाजवी तिकीट दर आकारण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, आताही विमान तिकिटाचे दर गगनाला भिडले असल्याने अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रयागराज येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकारने विमान कंपन्यांना अतिरिक्त विमान सेवांना परवानगी देण्याबाबत सहमती दाखवली. त्यानुसार, विमान कंपन्यांनीही प्रयागराज येथे जाणाऱ्या विमान सेवांची संख्या वाढवली. त्यानंतर, तिकीट दर किरकोळ कमीही झाले. मात्र, अजूनही या प्रवासासाठी कंपन्या 'वाजवी दर' आकारत नाहीएत. मुंबई ते प्रयागराज तिकिटाचे दर आत्ताही २० हजाराच्या रेंजमध्ये आहेत. नजिकच्या तारखेचं तिकीट हवं असेल तर ते ३०-३५ हजारांच्या घरात जातं.
सोशल मीडियावर भाविक, पर्यटाकांची तक्रार अन् तीव्र नाराजी
अनेक प्रवासी, भाविक, पर्यटकांनी प्रयागराजला जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर प्रचंड असल्याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. लंडन किंवा अमेरिकेला जाण्यापेक्षा प्रयागराज येथे विमानाने जाणे महागले असल्याचा दावाही काही जणांनी केला आहे. काही जणांनी विमान तिकिटाच्या दराचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. ही अक्षरशः लूट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अनेक युझर्सनी नागरी विमान उड्डाण मंत्रालय, डीजीसीए यांना टॅग करत याबाबत गाऱ्हाणी मांडली आहेत.
राज्यसभेतही काँग्रेस सदस्यांनी प्रयागराज येथे जाण्यासाठी विमानाचे तिकीट दर प्रमाणाबाहेर असल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. तर अनेक जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांना टॅग केले आहे. सरकारने सांगूनही विमान कंपन्यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे, यावरून आता सरकार काही कारवाई करत ठोस भूमिका घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.