ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - मॅगीत कोणतेही हानिकारक घटक नसून भारतातील मॅगी सुरक्षित असल्याचे सांगत ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासच आमचे प्राधान्य असल्याचे 'नेस्ले'चे ग्लोबल सीईओ पॉल बल्क यांनी स्पष्ट केले. 'मॅगी नूडल्स'मध्ये प्रमाणापेक्षा अधिक शिसे आढळल्याने सुरू झालेल्या वादानंतर नेस्ले कंपनीने बाजारातून मॅगीची पाकिटे परत मागवली होती. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर नेस्ले कंपनीतर्फे आज एक पत्रकार परिषद घेऊन मॅगी हानिकारक नसल्याचा पुनरुच्चार करण्यात आला.
संपूर्ण जगात 'मॅगी'ची समान गुणवत्ता राखली जाते, मॅगीमध्ये आम्ही एमएसजी मिसळत नाही, नूडल्समध्ये शिसं कसं आलं याचाच आम्ही तपास करत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या घटनांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून त्यांच्या विश्वास तुटल्यानेच आम्ही बाजारातून मॅगी परत मागवले आहे, असेही बल्क यांनी सांगितले. मात्र या संदर्भात ज्या ज्या शंका उपस्थित झाल्या आहे त्याबाबत स्पष्टीकरण देऊन, सर्वांचे निरसन करून लवकरच आम्ही परत येऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान भारतातील अनेक राज्यांसह परदेशातही मॅगीवर बंदी घालण्यात आली आहे. मध्य प्रदेश आणि बिहारने आजपासून मॅगीवर महिन्याभराची बंदी घातली असून सिंगापूर व नेपाळमध्येही मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.