सूत जुळलं! 7 मुलांच्या आईचं गावातील तरुणावर प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 15:05 IST2022-02-04T15:02:09+5:302022-02-04T15:05:46+5:30
सात मुलांची आई तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पळून गेल्याची अजब घटना घडली आहे.

सूत जुळलं! 7 मुलांच्या आईचं गावातील तरुणावर प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं अन्...
नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सात मुलांची आई तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पळून गेल्याची अजब घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये ही अजब प्रेमाची गजब गोष्ट पाहायला मिळाली आहे. गावासोबतच आजुबाजुच्या परिसरात देखील आता या प्रेमाची जोरदार चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील मातगुवां पोलीस ठाणेच्या परिसरातील पिपोरकला या गावात ही घटना घडलीय या गावात कमला नावाची महिला आपला प्रियकर रामकिशोर शुक्लासोबत पळून गेली आहे. कमलाला सात मुलं असून ती सर्वात लहान मुलीला आपल्या सोबत घेऊन गेली. बाकीच्या मुलांना नवऱ्याकडे सोडलं आहे. पत्नी पळून गेल्यापासून पती सातत्याने पोलीस ठाण्यात चकरा मारत आहे. मात्र त्याला याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही.
7 मुलांची आई पडली प्रेमात; पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार
महिलेच्या मोठ्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, आई पळून जाताना घरातून तिचं ओळखपत्र, आधारकार्ड आणि तब्बल 65 हजार रुपये घेऊन गेली आहे. तर नाराज झालेल्या पतीने भलतीच माहिती दिली आहे. त्याने कमला घरातून काही कागदपत्र आणि दहा हजार रुपये घेऊन गेल्याचं म्हटलं आहे. गावातीलच एका तरुणासोबत ती पळून गेल्याचं देखील सांगितलं. तसेच पतीने पोलिसांनी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेण्यासाठी लाच मागितल्याची देखील माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.