भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यावर काँग्रेसने तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करत निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली होती. आता सरकारने आणलेल्या जय किसान कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकरी अर्ज भरत आहेत. मात्र या कर्जमाफीचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या ज्या याद्या लावण्यात आल्या आहेत. त्यावरून शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या नावासमोर 30 रुपये तर काहींच्या नावासमोर वालासमोर 100 रुपये माफ झाल्याचे दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, सरकारी बँकांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना इंग्रजी वाचता येत नसल्याने कर्जमाफी झालेल्यांमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे जाणून घेण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. निपानीया येथील शिवलाल आणि शिवनारायण हे दोन शेतकरी आपली बँक पासबूक घेऊन सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. दोन्ही शेतकऱ्यांवर 20 हजार पेक्षा अधिक कर्ज आहे. मात्र त्यांचे केवळ 13 रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. जर सरकार कर्ज माफ करत असेल तर पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, 13 रुपये 5 रुपये एवढ्या पैशांची तर आम्ही विडी पितो, अशा शब्दात या शेतकऱ्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. मध्य प्रदेशमधील खरगौन येथील शेतकरीसुद्धा या किरकोळ कर्जमाफीमुळे त्रस्त आहेत. येथील अनेक शेतकऱ्यांचे 25, 50, 150, 180 आणि 300 रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाले आहे. मुख्यमंत्री कमनलाथ यांच्या छिंडवाडा मतदारसंघातील हमीद खाँ यांच्या नावावर दहा हजार रुपयांचे कर्ज आहे. मात्र त्यापैकी केवळ 232 रुपयांचे कर्जमाफ झाले आहे. तर माळवा येथील नारायण सिंह यांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पण पण त्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बँकांकडे हिंदी सॉफ्टवेअर नसल्याने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीतून प्रसिद्ध केली, असा दावा बँक अधिकाऱ्यांनी केला आहे. कर्जामाफीच्या या गोंधळावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. हे सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देत आहे. याचे परिणाम कांग्रेसला लोकसभा निवडणुकीत भोगावे लागतील, असे भाजपाने म्हटले आहे.
कुणाचे ५, तर कुणाचे १३ रुपये माफ; मध्य प्रदेशात शेतकरी कर्जमाफीचा फार्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 15:00 IST
मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यावर काँग्रेसने तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करत निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली होती.
कुणाचे ५, तर कुणाचे १३ रुपये माफ; मध्य प्रदेशात शेतकरी कर्जमाफीचा फार्स?
ठळक मुद्देमध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यावर काँग्रेसने तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलीसरकारी बँकांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाल्याने शेतकरी त्रस्तकाही शेतकऱ्यांना मिळाली किरकोळ कर्जमाफी