ग्वालियर: गोविंदापासून सलखान खानपर्यंत बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांना आपल्या डान्सनं भुरळ घालणाऱ्या डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव यांच्या मेव्हणावर गोळीबार झाला आहे. ज्या तरुणावर गोळीबार झाला, त्याच तरुणाच्या लग्नात केलेल्या डान्सनं डान्सिंग अंकल प्रसिद्धीच्या झोतात आले होते. विदिशामध्ये राहणारे प्राध्यापक संजीव श्रीवास्तव उर्फ डब्बूजी यांचा मेहुणा कुशाग्रवर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला. ग्वालियरच्या जनकगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कुशाग्रची अवस्था गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुशाग्रच्या पायाला गोळी लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे दिवसाढवळ्या हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून या घटनेचा तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्हीमधील फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे. डब्बूजी यांचं कुटुंब कुशाग्रला भेटण्यासाठी विदिशाहून ग्वालियरला रवाना झालं आहे. कुशाग्रच्या लग्नात संजीव श्रीवास्तव यांनी गोविंदाच्या 'खुदगर्ज' चित्रपटातील 'आप के आ जाने से' या गाण्यावर डान्स केला होता. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
धक्कादायक! ज्याच्या लग्नामुळे 'डान्सिंग अंकल' झाले स्टार, 'त्या' तरुणावर अज्ञातानं झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 18:51 IST