मनसेच्या पदाधिकार्यांना धडकी ऑडिट : राज यांच्या निर्णयाकडे लक्ष
By Admin | Updated: May 12, 2014 16:47 IST2014-05-12T15:52:01+5:302014-05-12T16:47:48+5:30
नाशिक : राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अचानक भेट देऊन नगरसेवकांकडून लोकसभा निवडणूक आणि पालिकेच्या कामकाजाविषयी थेट माहिती मिळविल्याने आता पदाधिकार्यांना धडकी भरली आहे. शुक्रवारी होणार्या मतमोजणीनंतर राज ठाकरे याबाबत निर्णय घेणार असून, कोणावर गंडांतर येणार याची चर्चा मनसेत सुरू झाली आहे.

मनसेच्या पदाधिकार्यांना धडकी ऑडिट : राज यांच्या निर्णयाकडे लक्ष
नाशिक : राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अचानक भेट देऊन नगरसेवकांकडून लोकसभा निवडणूक आणि पालिकेच्या कामकाजाविषयी थेट माहिती मिळविल्याने आता पदाधिकार्यांना धडकी भरली आहे. शुक्रवारी होणार्या मतमोजणीनंतर राज ठाकरे याबाबत निर्णय घेणार असून, कोणावर गंडांतर येणार याची चर्चा मनसेत सुरू झाली आहे.
राज ठाकरे यांनी नाशिकला महत्त्व दिले आणि त्यामुळेच शहरातील तीन आमदारांबरोबरच पालिकेची सत्ता मनसेला मिळाली. परंतु दोन वर्षांत अपेक्षित कामगिरी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आणि खुद्द ठाकरे यांचेही तसेच मत बनल्याने लोकसभा निवडणुकीच्या आधी नाशिकमध्ये येऊन त्यांनी झाडाझडती घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते कार्यप्रवण करण्याचा राज यांचा प्रयत्न असला, तरी लोकसभा निवडणुकीत मात्र मोठ्या प्रमाणात विसंगती आणि अनसमन्वय असल्याची मनसेतच चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकीत फाटाफूट झाल्याचीदेखील चर्चा आहे. लोकसभा निवडणूक आटोपली; परंतु विधानसभेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून राज यांनी शनिवारी नगरसेवकांची व्यक्तिगत भेट घेऊन त्यांना मन मोकळे करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत काय घडले, त्याचबरोबर पदाधिकारी, आमदार, महापौर आणि पालिकेतील पदाधिकार्यांविषयीदेखील माहिती घेतल्याने ही खांदेपालटाची सुरुवात असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार योग्य होता; परंतु प्रचार संघटनेची योग्य यंत्रणा निवडणुकीत वापरली गेली नाही. कार्यकर्ते आणि उमेदवार यांच्यात समन्वय घालण्याची गरज असताना नेमके तेच केले गेले नाही. काहींनी तर पदाधिकार्यांच्या घराच्या आसपास असलेल्या मतदान केंद्रांवर पक्षाचे बूथ नव्हते, अशा थेट तक्रारी केल्या आहेत. त्यामुळेच राज आता काय निर्णय घेणार याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. विशेषत: राज यांच्या दृष्टीने लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. परंतु त्याचबरोबर विधानसभा निवडणूकही महत्त्वाची आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतमोजणीचे निकाल आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून कडक निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याने संघटना आणि सत्तेतील पदाधिकारी हवालदिल झाले आहेत.
डॉ. पवार यांच्यावर मोठी जबाबदारी
लोकसभा निवडणुकीचा आढावा घेताना बहुसंख्य नगरसेवकांनी डॉ. प्रदीप पवार यांच्याविषयी अनुकूल मत व्यक्त केल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शहराध्यक्ष समीर शेटे यांना प्रकृतीच्या कारणावरून अन्य जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.