Lumpy Skin Disease: गायींनंतर आता कुत्र्यांना लंपी व्हायरसची लागण? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 19:11 IST2022-09-30T19:11:03+5:302022-09-30T19:11:40+5:30
गायींमध्ये पसरणाऱ्या लम्पी त्वचा रोगाने कहर केला आहे. या आजारामुळे आतापर्यंत लाखो गायींचा मृत्यू झाला आहे.

Lumpy Skin Disease: गायींनंतर आता कुत्र्यांना लंपी व्हायरसची लागण? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती
रतलाम: गायींमध्ये पसरणाऱ्या लम्पी त्वचा रोगाने (lumpy Skin Disease) देशात कहर केला आहे. या धोकादायक आजारामुळे आतापर्यंत लाखो गायींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कुत्र्यांमध्येही हा आजार पसरत असल्याचा दावा करण्यात येतोय. मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील जावरा येथे लम्पी व्हायरसग्रस्त कुत्र्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दावा केला जातोय की, कुत्रेदेखील लम्पी व्हायरसला बळी पडत आहेत. ही घटना खरी असेल, तर ही अतिशय गंभीर बाबत आहे. मात्र, स्थानिक पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुत्र्यांमध्ये लम्पीची शक्यता फेटाळून लावली आहे. या प्रकरणाला पाच ते दहा दिवसांचा कालावधी लोटले असून, पशुवैद्यकीय विभागाचे उपसंचालक डॉ.शर्मा यांना या प्रकरणाची माहिती नाही. या निष्काळजीपणामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
8-10 कुत्र्यांमध्ये लम्पीसारखी लक्षणे
जावरा नगरमधील आठ ते दहा भटक्या कुत्र्यांमध्ये लम्पी व्हायरसची लक्षणे दिसून आली आहेत. या कुत्र्यांच्या अंगावर फोड आले आहेत, त्यामुळे त्यांना खाज येण्यासारख्या समस्याही होत आहेत. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. स्थानिक लोक याला लम्पी व्हायरस म्हणत आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ
रतलाम जिल्ह्यातील लोक भटक्या कुत्र्यांमुळे हैराण झाले आहेत. त्यांची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात एबीसी (नसबंदी) कार्यक्रमानंतर कुत्रे अधिक हिंसक झाले आहेत. जावराचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पी.एस.कुशवाह यांच्या म्हणण्यानुसार लम्पी विषाणू फक्त गायी आणि म्हशींमध्ये दिसून आला आहे. कुत्र्यांच्या शरीरावर आलेल्या गुठळ्या लम्पीच्या आहेत की, नाही याबाबत तपासणी करावी लागेल.