हृदयद्रावक! मुलांना खेळण्यासाठी फुगा देत असाल तर सावधान; चिमुकल्याला गमवावा लागला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:26 IST2024-12-06T12:22:32+5:302024-12-06T12:26:09+5:30
एका अडीच वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.

हृदयद्रावक! मुलांना खेळण्यासाठी फुगा देत असाल तर सावधान; चिमुकल्याला गमवावा लागला जीव
लखनौच्या ठाकूरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील दौलतगंज परिसरात एक दुःखद घटना घडली आहे. एका अडीच वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. मुलगा फुग्याशी खेळत असताना अचानक फुगा फुटल्याची धक्कादायक घटना घडली. फुटलेल्या फुग्याचे तुकडे मुलाच्या घशात अडकले, त्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता.
घटनेनंतर लगेचच मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये नेलं, तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलगा खेळत असताना तो फुग्यांसोबत मजा करत होता, मात्र अचानक हे असं झाल्याने मुलाच्या जीवावर बेतलं.
स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून ही घटना अन्य काही कारणाने घडली आहे का याचाही शोध घेतला जात आहे. अशा धोकादायक गोष्टींशी खेळताना मुलांनी काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा घटना टाळता येतील, असे पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
ही घटना लहान मुलांच्या पालकांसाठी एक इशारा आहे की, खेळताना मुलांच्या आजूबाजूच्या खेळणी आणि वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. विशेषत: फुग्यांसारख्या लहान वस्तू लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात, कारण घशात अडकल्याने श्वास घेण्यास त्रास होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.