केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये अचानक बेशुद्ध पडला 9 वीचा विद्यार्थी; हार्ट अटॅकमुळे गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 10:36 IST2023-09-21T10:29:36+5:302023-09-21T10:36:54+5:30
केमिस्ट्रीचा क्लास सुरू असताना 9वीत शिकणारा विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडला. मुलाला उचलून टेबलावर ठेवलं, पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलीगंज येथील सिटी मॉन्टेसरी स्कूल (CMS) येथे केमिस्ट्रीचा क्लास सुरू असताना 9वीत शिकणारा विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडला. मुलाला उचलून टेबलावर ठेवलं, पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की मुलाला हार्ट अटॅक आला होता, त्याला सीपीआर देखील देण्यात आला होता, तरीही त्याला वाचवता आले नाही. या घटनेचे डॉक्टरही हैराण झाले आहेत.
लखनौचे केमिस्ट्रीचे शिक्षक नवीन कुमार यांनी सांगितलं की, ते केमिस्ट्रीचा क्लास घेण्यासाठी गेले होते. ज्या मुलांना अभ्यासासंबंधित काही समस्या होत्या त्यांच्या शंकांच निरसन करत होतो. यावेळी नववीचा विद्यार्थी आतिफ सिद्दीकी हा सेल्फ स्टडी करत होता. सेल्फ स्टडी करत असताना अचानक तो बेशुद्ध पडला. मी लगेच त्याला उचलून टेबलावर ठेवलं आणि शाळेच्या नर्सला बोलावलं.
शाळेच्या नर्सने येऊन पाहिलं आणि मुलाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल असं सांगितलं. यानंतर विद्यार्थ्याला आरुषी मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ताबडतोब मुलाला लारी मेडिकल सेंटरमध्ये घेऊन जा, असे सांगितले. यानंतर आम्ही लारी मेडिकल सेंटरमध्ये गेलो.
याप्रकरणी सीएमएस शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कश्यप यांनी सांगितले की, शाळेत एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. शाळेतील शिक्षक आणि नर्स ताबडतोब इयत्ता नववीतल्या आतिफ सिद्दीकी या विद्यार्थ्याला त्यांच्या कारमध्ये वैद्यकीय केंद्रात घेऊन गेले, तोपर्यंत मुलाच्या वडिलांनाही फोनवरून माहिती देण्यात आली. तेही आरुषी मेडिकल सेंटरमध्ये पोहोचले. तिथे डॉक्टरांनी मुलाला सीपीआर दिला, मात्र त्यानंतरही मुलाला शुद्ध आली नाही.
यानंतर डॉक्टरांनी मुलाला हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. मुख्याध्यापिका ज्योती कश्यप म्हणाल्या की, या घटनेने संपूर्ण सीएमएस कुटुंबाला धक्का बसला आहे आणि दु:ख झालं आहे. या कठीण काळात आम्ही मुलाच्या कुटुंबासोबत आहोत आणि कोणत्याही तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.