अभिमानास्पद! मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 13:39 IST2019-07-22T23:14:49+5:302019-07-23T13:39:57+5:30
नरवणे ३७ वर्षांपासून लष्कराच्या सेवेत

अभिमानास्पद! मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती
नवी दिल्ली: लष्करानं मोठे फेरबदल करताना लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणेंची उपप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. सध्या लेफ्टनंट असलेले डी. अंबू ३१ ऑगस्टला निवृत्त होतील. त्यानंतर या पदाची सूत्रं नरवणेंकडे येतील. सेवाज्येष्ठतेनुसार नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या लष्कर प्रमुख असलेले बिपिन रावत ३१ डिसेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर नरवणे हे लष्करातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे लष्कर प्रमुखपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या लेफ्टनंट जनरल असलेल्या रणबीर सिंग यांच्याकडे लष्कर प्रमुख पद दिलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र आताच्या नियुक्तीमुळे नरवणेंकडे लष्कराचं प्रमुखपद येण्याची शक्यता वाढली आहे.
मनोज नरवणेंनी आतापर्यंत ३७ वर्षे लष्करात सेवा बजावली आहे. या काळात विविध भागांमध्ये आणि विविध पदांवर काम करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी ईशान्य भारतात इन्फंट्री ब्रिगेडचं आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचं नेतृत्व केलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्धी असलेल्या नरवणेंनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या ७व्या बटालियनमधून लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली. ईशान्य भारत, जम्मू काश्मीरसह श्रीलंकेत भारतीय शांतता सुरक्षा दलाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे.