मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे सध्या ऊर्जा क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. याचा थेट परिणाम घरगुती इंधनावर होताना दिसत असून, अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही पीएनजी ग्राहक मात्र बिनधास्त आहेत. दोन्ही गॅस स्वयंपाकासाठीच वापरले जात असताना, एकासाठी रांगा आणि दुसरा सहज उपलब्ध असे का? यामागील नेमके कारण आणि या दोन्हीतील फरक समजून घेऊया.
एलपीजी म्हणजे काय?
एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) हा गॅस प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणातून आणि नैसर्गिक वायूच्या प्रक्रियेतून तयार होतो. यामध्ये प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन वायू असतात. हे वायू द्रव रूपात कॉम्प्रेस करून लोखंडी सिलिंडरमध्ये साठवले जातात. हे सहजपणे कोठेही नेले जाऊ शकतात. म्हणून ते ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात लोकप्रिय आहेत.
पीएनजी म्हणजे काय?
पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) हा गॅस सिलिंडरऐवजी थेट पाईपलाईनद्वारे घरांपर्यंत पोहोचवला जातो.याची प्रणाली घराच्या पाण्याच्या कनेक्शनसारखी असते. जमिनीखालून पसरलेल्या पाईपलाईनच्या जाळ्याद्वारे याचा पुरवठा होतो. ग्राहकांना सिलिंडर बुक करण्याची किंवा संपण्याची भीती नसते. जितका वापर होईल, तितकेच बिल भरावे लागते.
एलपीजी आणि पीएनजी यांच्यातील फरक
एलपीजी गॅस हवेपेक्षा जड असतो. त्यामुळे गॅस गळती झाल्यास तो जमिनीवर साचून राहतो, जो धोकादायक ठरू शकतो. याउलट, पीएनजी वायू हवेपेक्षा हलका असतो. गळती झाल्यास तो लगेच हवेत मिसळतो, ज्यामुळे आगीचा धोका कमी असतो. पीएनजीचा वापर हा वापरानुसार बिलिंगवर आधारित असतो, जो अनेकदा सिलिंडरच्या तुलनेत किफायतशीर ठरतो. एलपीजीसाठी ट्रक आणि डिलिव्हरी बॉयवर अवलंबून राहावे लागते, तर पीएनजीचा पुरवठा चोवीस तास अखंडित सुरू असतो. महत्त्वाचे म्हणजे, पीएनजीची १०० टक्के मागणी ही भारतात उत्पादित होणाऱ्या गॅसद्वारे पूर्ण केली जाते.