LPG Cylinder : घरगुती गॅस सिलिंडरचं वजन सरकार कमी करणार?; पाहा काय आहे यामागील कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 13:51 IST2021-12-07T13:50:52+5:302021-12-07T13:51:17+5:30
LPG Cylinder : एलपीजी सिलिंडरचं वजन १४.२ किलो असल्यानं त्याची ने-आण करण्यात महिलांना निर्माण होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी सरकार याचं वजन कमी करण्यासह पर्यायांवर विचार करत आहे.

LPG Cylinder : घरगुती गॅस सिलिंडरचं वजन सरकार कमी करणार?; पाहा काय आहे यामागील कारण
एलपीजी सिलिंडरचं (LPG Cylinder) वजन अधिक असतं आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं तितकंच कठीण काम असतं. महिलांसाठी हे अशक्य काम नाही, पण वजन कमी केले तर नक्कीच ते थोडे सोपं होऊ शकतं. अनेकदा काहींना अधिक वजन उचलता येत नाही किंवा अधिक वजन उचण्यासाठी त्यांना मनाई केलेली असते. अशा परिस्थितीत गॅस सिलिंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावं लागल्यास अडचण निर्माण होते. मात्र महिलांच्या सोयीसाठी सरकार लवकरच एलपीजी सिलिंडरच्या किमतीही कमी करू शकते.
१४.२ किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची वाहतूक करताना महिलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सरकार त्याचे वजन कमी करण्यासह विविध पर्यायांवर विचार करत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. यापूर्वी एका सदस्यानं सिलिंडरचं वजन अधिक असल्यामुळे महिलांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला होता.
"महिला आणि मुलींना स्वत: अधिक वजनाचं सिलिंडर उचलावं लागू नये असं आम्हाला वाटतं. यासाठी त्याचं वजन कमी करण्यावर विचार केला जात आहे. आम्ही यातून एक मार्ग काढू. १४.२ किलोच्या सिलिंडरचं वजन कमी करून पाच किलो करायचं असेल किंवा अन्य कोणता पर्याय, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असंही ते म्हणाले.