LPU on Trump Tariff: लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये अमेरिकन शीतपेयांवर पूर्ण बहिष्कार टाकण्यात आला आहे. एलपीयूचे संस्थापक-कुलगुरू आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार डॉ. अशोक कुमार मित्तल यांनी याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी देशव्यापी 'स्वदेशी २.०' चळवळ सुरू करण्याची घोषणाही केली. अमेरिकेने भारतीय निर्यातीवरील शुल्क दुप्पट केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. २७ ऑगस्टपासून भारताला अमेरिकेच्या ५० टक्के अतिरिक्त शुल्काचा सामना करावा लागत आहे. २५ टक्के शुल्क आधीच लागू होते, आता त्यात दंड म्हणून लादलेला २५ टक्के शुल्क देखील जोडण्यात आला. त्यामुळे देशभरातून ट्रम्प प्रशासनाच्या निर्यणामुळे चिंतेचे वातारण तयार झालं आहे.
डॉ. अशोक कुमार मित्तल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त शुल्काच्या निर्णयाला ढोंगीपणा आणि गुंडगिरी म्हटले. भारताने या अन्यायकारक आदेशांपुढे झुकू नये, असं मित्तल यांनी म्हटलं. २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला राजघाटावर पुष्पांजली अर्पण केल्यानंतर डॉ. अशोक कुमार मित्तल दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पोहोचले होते. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये अमेरिकन शीतपेयांवर बंदी घालण्याची घोषणा करताना याद्वारे आम्ही जगाला स्पष्ट संदेश देऊ आहोत की भारत झुकणार नाही, असं म्हटलं.
यावेळी आप राज्यसभेचे खासदार डॉ. अशोक कुमार मित्तल यांनी बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल आणि अरबिंदो घोष यांसारख्या नेत्यांचे स्मरण केले. तसेच, त्यांनी १९०५ च्या स्वदेशी चळवळीची भावना जागृत करण्याबद्दल सांगितले. मला वाटतं अमेरिकेने भारताची ताकद कमी लेखला आहे. आता वेळ आली आहे की आपण त्यांना आपली खरी ताकद दाखवून दिली पाहिजे. अमेरिका आणि त्याचे युरोपीय मित्र रशियाकडून तेल खरेदी करत असताना भारताने राष्ट्रीय हितांना प्राधान्य दिल्याबद्दल आपल्याला अन्यायकारकपणे लक्ष्य केले जात आहे, असं अशोक मित्तल म्हणाले.
जर हे प्रतीकात्मक पाऊल देशव्यापी चळवळीत रूपांतरित झाले तर त्याचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असंही मित्तल यांनी म्हटलं. दरम्यान, टॅरिफच्या मुद्द्यावरुन भारत आणि अमेरिकेत व्यापाराबाबत तणाव वाढला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील शुल्क दुप्पट करून ५० टक्के करण्याचा निर्णय अधिकृतपणे लागू केला आहे. यामुळे भारतातील अनेक क्षेत्रांमध्ये नुकसान होण्याची भीती आहे.