उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. देवरानिया पोलीस स्टेशन हद्दीतील कमलुपूर गावात नात्यातील अदलाबदलीने संपूर्ण परिसराला धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय केशव कुमाराचं सहा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि तो दोन मुलांचा बाप आहे. असं असतानाही तो त्याची १९ वर्षांची मेहुणी कल्पनासह अचानक घरातून गायब झाला.
कुटुंबीयांनी दोघांचा खूप शोध घेतला पण ते सापडले नाही. ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली. यानंतर या घटनेत दुसऱ्याच दिवशी एक धक्कादायक ट्विस्ट आला. केशवचा मेहुणा म्हणजेच बायकोचा भाऊ रविंद्र याने बदला घेण्याचा निर्णय घेतला. चिडलेला मेहुणा केशव कुमारच्या १९ वर्षांच्या बहिणीसोबत पळून गेला. सर्वत्र याच घटनेची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
कुटुंबीयांनी या चौघांचा खूप शोध घेतला. परंतु जेव्हा ते अयशस्वी झाले तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोन दिवस शोध घेतल्यानंतर १४ आणि १५ सप्टेंबर रोजी पोलिसांनी या चौघांना शोधून काढलं. त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. दोन्ही कुटुंबांना बोलावण्यात आलं. दोन्ही कुटुंबाने हे प्रकरण शांततेत सोडवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
पोलीस आणि अनेक वडीलधारी मंडळी देखील यावेळी उपस्थित होती. खूप चर्चा झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी हे प्रकरण शांततेत सोडवलं. कोणतीही केस किंवा पोलीस कारवाई झाली नाही. जर दोन्ही जोडप्यांना त्यांचं जीवन त्यांच्या मनाप्रमाणे जगायचं असेल तर त्यांना त्यांचा मार्ग निवडण्याची परवानगी दिली पाहिजे यावर सर्वांचे एकमत झालं.