लव्ह जिहादची ना कायदेशीर व्याख्या, ना कोणत्याही गुन्ह्याची नोंद- गृह मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 08:00 PM2020-02-04T20:00:35+5:302020-02-04T20:28:32+5:30

लव्ह जिहादचा एकही गुन्हा केंद्रीय यंत्रणांनी नोंदवलेला नाही; गृह मंत्रालयाची माहिती

Love Jihad Not Defined Not Reported By Central Agencies says modi Government in lok sabha | लव्ह जिहादची ना कायदेशीर व्याख्या, ना कोणत्याही गुन्ह्याची नोंद- गृह मंत्रालय

लव्ह जिहादची ना कायदेशीर व्याख्या, ना कोणत्याही गुन्ह्याची नोंद- गृह मंत्रालय

googlenewsNext

नवी दिल्ली: लव्ह जिहादची कोणतीही व्याख्या कायद्यात नसल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं लोकसभेत दिली. लव्ह जिहादसारख्या कोणत्याही प्रकरणाची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी दिली नसल्याचं आणि अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकरणाची नोंद आपल्याकडे नसल्याचंदेखील गृह मंत्रालयाकडून लोकसभेत सांगण्यात आलं. केरळमध्ये लव्ह जिहादचं कोणतंही प्रकरण नसल्याचं केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं होतं. याबद्दल केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गृह मंत्रालयानं लिखित स्वरुपात उत्तर दिलं. 

लव्ह जिहादबद्दल गृह मंत्रालयानं लोकसभेत लिखित स्वरुपात दिलेल्या उत्तरात सध्याच्या कायद्यांचा उल्लेख आहे. 'लव्ह जिहादची कोणतीही व्याख्या कायद्यात नाही. केंद्रीय यंत्रणांकडेही लव्ह जिहादशी संबंधित कोणतीही माहिती नाही. केरळमध्ये दोन आंतरजातीय विवाहाची प्रकरणं समोर आली होती. याची चौकशी एनआयएकडून करण्यात आली होती,' असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. 

केरळमध्ये गेल्या काही महिन्यांत आंतरजातीय विवाहांची प्रकरणं समोर आली होती. त्यातलं हादिया प्रकरण देशभरात चर्चेत राहिलं होतं. हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर यामध्ये लव्ह जिहादचा विषय नसल्याचं समोर आलं. गेल्याच महिन्यात केरळमधल्या एका चर्चनं लव्ह जिहाद वास्तव असल्याचा दावा केला होता. दक्षिणेकडील राज्यांमधल्या ख्रिश्चन तरुणींना फसवून त्यांचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात असल्याचं चर्चेनं म्हटलं होतं. विश्व हिंदू परिषदेनं चर्चच्या या विधानाचं स्वागत केलं होतं. लव्ह जिहाद केरळसाठी मोठं आव्हान असून त्याविरोधात उभं राहण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषदेनं करण्यात आलं होतं. 

काही दिवसांपूर्वीच गृह मंत्रालयानं तुकडे तुकडे गँगबद्दलही अशीच माहिती दिली होती. तुकडे तुकडे गँगसंदर्भातली माहिती गृह मंत्रालयाकडे आरटीआयच्या माध्यमातून मागण्यात आली होती. त्यावर याबद्दलची कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचं उत्तर गृह मंत्रालयानं दिलं होतं. भाजपाच्या अनेक नेत्यांनी विरोधकांवर टीका करताना तुकडे तुकडे गँग या शब्दांचा वापर केला आहे. 
 

Web Title: Love Jihad Not Defined Not Reported By Central Agencies says modi Government in lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.