दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण कार ब्लास्टनंतर, रोजच्या रोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता एक महत्त्वाचा धागा तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. या मॉड्यूलमधील एक डॉ. शाहीन शाहिदने २५ सप्टेंबर २०२५ रोजी रोख रक्कम देत मारुती सुझुकी कंपनीची 'ब्रेझा' (Brezza) (कॉम्पॅक्ट SUV) खरेदी केल्याचे समोर आले आहे. डॉक्टर शाहीनला 'मॅडम सर्जन'ही म्हटले जात होते.
सिल्व्हर कलरची ही ब्रेझा शाहीनच्या नावावर खरेदी करण्यात आली होती. ही कार खरेदी करताना तिचा साथीदार डॉ. मुजम्मिलही तिच्यासोबत होता. महत्वाचे म्हणजे, ब्रेझासोबतचा या दोघांचा फोटो आता समोर आला असून तपासाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
मॅडम एक्स आणि मॅडम झेड कोण? -डॉ. शाहीनला 'मॅडम सर्जन' या कोड नावानेही ओळखली जात होते. तिच्या मोबाईल डेटा तपासणीतून दोन नंबर समोर आले आहेत. हे नंबर तिने 'मॅडम एक्स' आणि 'मॅडम झेड' नावाने सेव्ह केले होते. हे लोक कोडवर्डमध्ये बोलत असण्याची शंका तपास यंत्रणांना आहे. 'मॅडम एक्स'कडून आलेल्या एका मेसेजमध्ये "ऑपरेशनसाठी मेडिसिन कमी पडू नये," असे म्हटले आहे. या संभाषणातील 'मेडिसीन' हा शब्द स्फोटकांसाठी तर 'ऑपरेशन' हा शब्द दहशतवादी हल्ल्यासाठी वापरला गेला असावा, असा संशल तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता. या मॉड्यूलमध्ये डॉ. शाहीन, डॉ. मुजम्मिल आणि फिदायीन डॉ. उमर नबी यांचा समावेश आहे. हे डॉक्टर जम्मू-काश्मीरमधून दिल्ली-एनसीआरमध्ये स्फोटके आणण्याचे काम करत होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे.