भारतीय जवानांसाठी "पिटाई" शब्दाचा वापर योग्य नाही; परराष्ट्रमंत्र्यांनी राहुल गांधींना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 08:45 PM2022-12-19T20:45:52+5:302022-12-19T20:50:19+5:30

'राजकीय विरोध केला जाऊ शकतो, विचारही वेगळे असू शकतात, मात्र लष्कराचा अपमान होता कामा नये.'

LokSabha: "Pitai" Shouldn't Be Used For Jawans: S Jaishankar On Rahul Gandhi Remark | भारतीय जवानांसाठी "पिटाई" शब्दाचा वापर योग्य नाही; परराष्ट्रमंत्र्यांनी राहुल गांधींना सुनावले

भारतीय जवानांसाठी "पिटाई" शब्दाचा वापर योग्य नाही; परराष्ट्रमंत्र्यांनी राहुल गांधींना सुनावले

googlenewsNext


नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांनी भारतीय लष्करातील जवानांसाठी 'मारहाण'('पिटाई') असा शब्द वापरला होता. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी या वादावर आक्षेप घेत लोकसभेत उत्तर दिले आहे. भारतीय लष्करासाठी मारहाणीसारखे शब्द वापरणे योग्य नसल्याचे जयशंकर यांनी ठणकावले. 

जयशंकर यांची नाराजी
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, मी ऐकले आहे की काही लोक माझ्या शहाणपणावर शंका घेत आहेत. अशा टीकेमुळे मला काही फरक पडणार नाही. पण, जवानांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले जाऊ नये. आमचे जवान 13000 फूट उंचीवर सीमेचे रक्षण करत आहेत. त्यांना मारहाण सारखे शब्द वापरणे योग्य नाही. हा शब्द त्यांच्यासाठी वापरू नये. राहुल यांनी या मुद्द्यावर सरकार उदासीन असल्याचा आरोप केला होता, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती.

लष्कराचा अपमान नको...
जयशंकर पुढे म्हणाले, आम्ही चीनबाबत उदासीन असतो तर सीमेवर सैन्य का पाठवले असते का? जर आपण उदासीन असतो, तर आपण डी-एस्केलेशन आणि डिसेंगेजमेंटबद्दल का बोलू? चीनशी आमचे संबंध सामान्य नाहीत, असे आपण का म्हणतो? राजकीय विरोध केला जाऊ शकतो, विचारही वेगळे राहू शकतात, मात्र लष्कराचा अपमान होता कामा नये, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी?
काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमा वादावर सविस्तर भाष्य केले होते. भारत सरकार झोपले आहे आणि चीन सातत्याने आक्रमक धोरण अवलंबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. चीनच्या मुद्द्याकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचेही ते म्हणाले. भारत सरकार झोपले आणि चीन युद्धाच्या तयारीत आहे. चीनने आपला 2 हजार किमी चौरस व्यापला आहे आणि आपल्या सैनिकांना मारहाण करत आहे, असे वक्तव्य राहुल यांनी केले होते.
 

Web Title: LokSabha: "Pitai" Shouldn't Be Used For Jawans: S Jaishankar On Rahul Gandhi Remark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.