Lokmat Parliamentary Awards: मला 56 इंची छाती दाखवण्यात काडीमात्र रस नाही; ओवेसींचा मोदींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 17:35 IST2019-12-10T17:23:33+5:302019-12-10T17:35:00+5:30
Lokmat Parliamentary Awards 2019 : देशभरात गाजत असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन शरसंधान

Lokmat Parliamentary Awards: मला 56 इंची छाती दाखवण्यात काडीमात्र रस नाही; ओवेसींचा मोदींना टोला
https://www.lokmat.com/topics/lokmat-parliamentary-awards/नवी दिल्ली: एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींनी ५६ इंच छातीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. मला ५६ इंच छाती दाखवण्यात काडीमात्र रस नाही. माझ्या आणि मोदींच्या फकिरीत जमीन अस्मानाचं अंतर आहे, असा टोला त्यांनी लगावला. सध्या देशात गाजत असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावरदेखील त्यांनी भाष्य केलं. ते लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.
मी कोणत्याही ऑर्केस्ट्रा पार्टीचा गायक होऊ शकत नाही. मला मुशायरादेखील करायचा नाही. ५६ इंच छाती दाखवण्यात मला जरासाही रस नाही, अशा शब्दांत ओवेसींनी मोदींना चिमटा काढला. यावेळी त्यांनी मुस्लिमांच्या लांगुलचालनाच्या राजकारणाबद्दलचं त्यांचं परखड मत मांडलं. 'तुम्हाला मी सांगत असलेली गोष्ट कदाचित कटू वाटेल. पण कधीकधी कटू गोष्टीदेखील ऐकायला हव्यात. तुम्ही मुस्लिम समुदायाला समजून घेत नाही, ही खरी समस्या आहे. तुम्हाला केवळ ईद आणि बकरी ईदच्या दिवशी त्यांची आठवण येते. सरकारला मुस्लिमांच्या समस्या समजून घ्यायच्या नाहीत. मुस्लिमांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा बदलल्या आहेत. मात्र राजकीय पक्षांना त्या अद्याप समजलेल्या नाहीत,' अशी खंत ओवेसींनी व्यक्त केली.
मुस्लिमांच्या लांगुलचालनाच्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलं. माझ्यावर कायमच तसे आरोप होतात. मला देशाचा नेता व्हायचं नाही. देशातील कमकुवत समाज घटकांना सक्षम करण्याचा माझा प्रयत्न आहे. दलित, मुस्लिम, आदिवासी समुदायांना देशाच्या भवितव्यासाठी सामर्थ्यवान करायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावर सडकून टीका केली. राष्ट्राच्या आधारावर आपण नागरिकत्वाचा कायदा करत आहोत. मौलाना अब्दुल कलाम आझाद म्हणाले होते की, मी एक हिंदुस्थानी मुसलमान आहे, माझं या राष्ट्राशी 1 हजार वर्षांचं जुनं नातं आहे, याची आठवण ओवेसी यांनी करून दिली. मुसलमान असल्यानं आमचा त्या विधेयकात समावेश नसल्याचा आरोपही त्यांनी केला.