पती किंवा पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे घडणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दररोज कुठून ना कुठून अशा घटनांच्या बातम्या समोर येत असतात. दरम्यान, आता कर्नाटकमधील बंगळुरू दक्षिण जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे माजी पंचायत समिती अध्यक्ष लोकेश यांचा विषप्राशन केल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यांच्या मृतदेहाजवळ विषाची एक बाटलीही सापडली होती. त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या ही आत्महत्या भासत होती. त्यामुळे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदवसाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासामधून मात्र धक्कादायक माहिही समोर आली.
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मृत लोकेश यांची पंचायत समिती सदस्य असलेली पत्नी चंद्रलेखा हिने पत्रकार परिषद घेऊन पतीचा मृत्यू आत्महत्या असल्याचे सांगितले. लोकेश हे कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे त्यांनी विषप्राषन केले, असे तिने सांगितले. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात शोकविलाप केला. मात्रा या घटनेचा तपास करत असलेल्या पोलिसांना घटनास्थळी काही गोष्टी संशयास्पद असल्याचे दिसून आले. तसेच शवविच्छेदनामधून लोकेश यांचा मृत्यू हा विष पोटात गेल्याने झाल्याचे समोर आले. मात्र काही विष छातीमध्ये अडकल्याचे निष्पन्न झाले. असे कुणी जबरदस्तीने विष पाजले तरच होऊ शकते, त्यामुळे पोलिसांना असलेला संशय अधिकच पक्का झाला.
पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही तपासले तेव्हा लोकेशच्या मृत्यूपूर्वी एक काळी कार त्याचा पाठलाग करत होती, असे दिसून आले. तसेच योगेश नावाच्या तरुणाचा मोबाईल त्याच भागात सक्रिय असल्याचे मोबाईल टॉवर डेटामधून दिसून आले. हाच योगेश मागच्या दोन महिन्यांपासून चंद्रलेखा हिच्या संपर्कात होता. तसेच हे दोघेही एकमेकांना भेटत होते. दरम्यान, पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा या संपूर्ण हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. त्याने पोलिसांना सांगितले की, चंद्रलेखाच्या सांगण्यावरून एका गुन्हेगारी टोळीला लोकेश याच्या हत्येची सुपारी दिली होती. २३ जून रोजी लोकेश हे कामासाठी गेले असताना आरोपी शिवलिंगा, सूर्या आणि चंदन यांनी काळ्या कारमधून त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर निर्मनुष्य ठिकाणी लोकेश यांना अडवून त्यांना जबरदस्तीने विष पाजले. त्यानंतर ही आत्महत्या भासावी यासाठी मृतदेह रस्त्याच्या कडेला तसाच सोडला.
या प्रकरणी सुमारे तीन आठवडे तपास केल्यानंतर पोलिसांना संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली लोकेश यांची पत्नी चंद्रलेखा, तिचा प्रियकर योगेश आणि सुपारे घेऊन हत्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली.