मतमोजणीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 19:05 IST2019-05-22T19:04:49+5:302019-05-22T19:05:41+5:30
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचे आदेश

मतमोजणीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना
नवी दिल्ली: ईव्हीएमवरुन वाद सुरू असल्यानं उद्या मतमोजणीवेळी हिंसाचार होण्याची शक्यता गृह मंत्रालयाला आहे. त्यामुळेच मंत्रालयानं सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. काही व्यक्तींकडून हिंसेला प्रोत्साहन देणारी भडकावू विधानं केली जाण्याची शक्यता असल्यानं मतमोजणी केंद्रं आणि ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळील सुरक्षेत वाढ करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याच्या सूचनादेखील गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातलं मतदान रविवारी संपलं. उद्या सकाळी 8 पासून देशभरात मतमोजणीला सुरुवात होईल. यावेळी काही भागात हिंसाचार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी योग्य निर्णय घेण्याच्या सूचना गृह मंत्रालयाकडून राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या गेल्या आहेत.
मतमोजणी केंद्रं आणि स्ट्राँग रुम्सची सुरक्षा वाढवण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. काही व्यक्तींकडून चिथावणीखोर विधानं करुन परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळेच गृह मंत्रालयानं ही सूचना केली आहे. ईव्हीएमबद्दल भाष्य करताना माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी भडकावू विधान केलं आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्यास रक्त सांडेल, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. हत्यार उचलण्याची गरज भासल्यास तेही करू, असंदेखील कुशवाहा म्हणाले होते.