Lockdown: Will lockdown be increased in the country? central government may be decision today pnm | Lockdown: ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवणार की नाही? केंद्र सरकार आज निर्णय घेण्याची शक्यता

Lockdown: ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवणार की नाही? केंद्र सरकार आज निर्णय घेण्याची शक्यता

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय उड्डाणासोबत मॉल्स आणि सिनेमागृह बंद ठेवण्याची सूचना राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्थानिक परिस्थितीनुसार याचा निर्णय घेतील.अनेक राज्यांनी ३१ मे नंतरही लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा रविवारी ३१ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन वाढवणार का? किंवा यात काही शिथिलता आणून सूट देण्यात येईल यावर चर्चा सुरु आहे. केंद्र सरकार याबाबत आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. शुक्रवारी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली.

दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत गृहमंत्र्यांसमोर आपली मतं मांडली. शहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या संवादात झालेल्या चर्चेची माहिती आणि पर्यायाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली आहे. पहिल्यांदाच शहा यांनी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी वेगवेगळा संवाद साधला. यापूर्वी लॉकडाऊन संपण्यापूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करत होते.

अनेक राज्यांनी ३१ मे नंतरही लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. मागील वेळी केंद्राने राज्य सरकारला लॉकडाऊनमध्ये सूट देण्याबाबत स्वत: निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. कदाचित यावेळीही अशाप्रकारे होण्याची शक्यता आहे. १ जूनपासून लॉकडाऊन वाढवलं तर त्यात सूट देण्याबाबत केंद्र सरकारची भूमिका मर्यादित असेल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्थानिक परिस्थितीनुसार याचा निर्णय घेतील.

केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय उड्डाणासोबत मॉल्स आणि सिनेमागृह बंद ठेवण्याची सूचना करतील. त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क घालणे बंधनकारक करण्यात येईल. शाळा, मेट्रो सुरु करण्याबाबत राज्य सरकारला निर्णय घेण्याची परवानगी देतील. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यानंतर ३ मे, १७ मे अशाप्रकारे ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं. सध्या देशात शुक्रवारपर्यत १ लाख ६५ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा ४ हजार ७०६ पर्यंत पोहचला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lockdown: Will lockdown be increased in the country? central government may be decision today pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.