संसदेत 'निळ्या हळदी'ची चर्चा; प्रियांका गांधींनी मोदींना सांगितला औषधी उपाय; चहापानात पिकला हशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:19 IST2025-12-19T17:18:18+5:302025-12-19T17:19:31+5:30
काँग्रेस खासदार प्रियांका गांधींच्या हजरजबाबीपणाने संसदेत मैफल रंगल्याचे पाहायला मिळाले.

संसदेत 'निळ्या हळदी'ची चर्चा; प्रियांका गांधींनी मोदींना सांगितला औषधी उपाय; चहापानात पिकला हशा
Parliament:संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता आज स्थगितीने झाली. सभागृहातील गदारोळानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी आयोजित केलेल्या पारंपारिक चहापानाच्या कार्यक्रमात मात्र एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये रंगलेल्या अनौपचारिक गप्पांमुळे संसदेत हलकं फुलकं वातावरण निर्माण झालं होतं.
गप्पांची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या अलीकडील परदेश दौऱ्याने झाली. पंतप्रधानांनी इथिओपियाची राजधानी अदीस अबाबाच्या सौंदर्याचे कौतुक केले, ज्याला प्रियांका गांधींनीही दुजोरा दिला. याच संवादादरम्यान प्रियांका गांधींनी वायनाडच्या एका खास गोष्टीचा उल्लेख केला. त्यांनी निळी हळद आणि तिचे फायदे सांगितले. प्रदूषणामुळे होणारा घशाचा त्रास आणि छातीच्या विकारांवर ही हळद अत्यंत गुणकारी असल्याचे त्यांनी सांगताच, उपस्थित खासदारांमध्ये कुतूहल निर्माण झाले.
घोषणाबाजी करण्यासाठी सत्र लांबवायचे का? PM मोदींचा टोला
अधिवेशनाच्या कालावधीवरूनही मिश्किल टिप्पणी पाहायला मिळाली. समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी तक्रार केली की, "हे सत्र खूपच छोटे होते, ते आणखी लांब असायला हवे होते." यावर पंतप्रधान मोदींनी हसत हसत उत्तर दिले, "हो, नक्कीच... घोषणाबाजी करण्यासाठी ना?" पंतप्रधानांच्या या फिरकीवर प्रियांका गांधींनीही तत्काळ उत्तर दिले. त्या म्हणाल्या, "आम्ही केवळ घोषणाच देत नाही, तर सभागृहात भाषणेही देतो" प्रियांका यांच्या या हजरजबाबीपणावर सर्वच नेत्यांमध्ये जोरदार हशा पिकला.
प्रियांका गांधी शिकतायत मल्याळम
वायनाडच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी आपण मल्याळम भाषा शिकत असल्याचे प्रियांका गांधी यांनी यावेळी आवर्जून सांगितले. एका हिंदी भाषिक नेत्याने दक्षिण भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न करणे ही बाब पंतप्रधानांसह अनेक खासदारांना भावली आणि त्यावरही हलकी-फुलकी चर्चा झाली.
सेंट्रल हॉलची कमतरता आणि गंभीर सूचना
या खेळीमेळीच्या वातावरणात काही महत्त्वाच्या सूचनाही मांडण्यात आल्या. काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा यांनी नवीन संसद भवनात सेंट्रल हॉल असण्याची गरज व्यक्त केली. जुन्या संसदेतील सेंट्रल हॉलमुळे विविध पक्षांच्या खासदारांमध्ये संवाद वाढण्यास मदत होत असे, तशीच व्यवस्था नवीन वास्तूतही असावी, असे त्यांनी सुचवले. या प्रस्तावावर अनेक खासदारांनी सहमती दर्शवली.