ठरले! एलआयसीचा आयपीओ मार्चमध्ये; गुंतवणूकदारांना मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:19 IST2022-01-14T08:27:10+5:302022-02-18T13:19:03+5:30

एलआयसीचे समायोजित मूल्य (एम्बेडेड व्हॅल्यू) चार लाख कोटी रुपये आहे.

LIC's IPO in March; Great opportunity for investors | ठरले! एलआयसीचा आयपीओ मार्चमध्ये; गुंतवणूकदारांना मोठी संधी

ठरले! एलआयसीचा आयपीओ मार्चमध्ये; गुंतवणूकदारांना मोठी संधी

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी येत्या मार्च महिन्यात आपला आयपीओ बाजारात दाखल करण्याची शक्यता आहे. सरकार जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत बाजार नियामक सेबीकडे कागदपत्र सादर करणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. एलआयसी या आयपीओतून १५ लाख कोटी रुपये (२०३ अब्ज डॉलर) उभे करण्याची शक्यता असून, हा भारतातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ ठरणार आहे. या आयपीओची ही भव्यता बघून याला ‘मदर ऑफ ऑल आयपीओ’ म्हणजेच ‘सर्व आयपीओंची जननी’ असे म्हटले जात आहे.

एलआयसीचे समायोजित मूल्य (एम्बेडेड व्हॅल्यू) चार लाख कोटी रुपये आहे. मात्र आयपीओनंतर कंपनीचे बाजारमूल्य (मार्केट व्हॅल्यू) चाैपट अधिक म्हणजेच जवळपास १५ लाख कोटी रुपये होईल. एलआयसीच्या मूल्याबाबतचा अंतिम अहवाल मात्र अजून आलेला नाही. अंतिम मूल्य हे अनेक निकषांवर अवलंबून असते. जानेवारी २०२२ च्या अखेरीस एलआयसी आयपीओची माहितीपुस्तिका जारी केली जाणार आहे.

मार्च २०२२ पर्यंत केंद्र सरकार एलआयसीमधील आपली ५ ते १० टक्के हिस्सेदारी विकणार आहे. कोविड-१९ साथीमुळे निर्माण झालेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी हा पैसा वापरला जाणार आहे.सरकार एलआयसी पॉलिसीधारकांसाठी १० टक्के प्रस्तावित आयपीओ राखीव ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे पॉलिसीधारकांना एलआयसीचे भागीदार बनण्याची संधी मिळणार आहे. 

भारतातील दुसरी मोठी कंपनी 

आयपीओच्या माध्यमातून बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर एलआयसी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी ठरणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे पहिले स्थान अबाधित राहील. मात्र, सध्या दुसऱ्या स्थानावर असलेली टीसीएस तिसऱ्या स्थानावर जाणार आहे.

Web Title: LIC's IPO in March; Great opportunity for investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.