नवी दिल्ली : संसदेत राहुल गांधींच्या हेरगिरीचे प्रकरण गाजले असताना सोमवारी देशभरातील विविध राज्यांच्या विधिमंडळांमध्येही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्यांवर आक्रमक धोरण अवलंबत सरकारला धारेवर धरल्यामुळे गोंधळ आणि तणावाचे चित्र दिसून आले. केरळ विधानसभेतील हाणामारीचा वाद पुरता संपलेला नाही. १३ मार्च रोजी विधानसभाध्यक्षांच्या कक्षाची तोडफोड केल्याबद्दल माकपच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीच्या (डीएलएफ) पाच आमदारांना सत्रावसान होईपर्यंत निलंबित करण्यात आले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा गुजरात विधानसभेत उपस्थित करणाऱ्या काँग्रेसच्या २० आमदारांनाही एक दिवसासाठी निलंबित केले. केरळचे अर्थमंत्री के.एम.मणी यांचा निषेध करताना डाव्या आघाडीच्या आमदारांनी गोंधळ घातला होता. पाच आमदारांना निलंबित करण्यासंबंधी ठराव मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी मांडला. विरोधकांनी त्याला जोरदार विरोध केल्यानंतर केरळ विधानसभा २३ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. गुजरात विधानसभेत काँग्रेसचे मुख्य प्रतोद बलवंतसिंग राजपूत यांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाल्याचा मुद्दा लक्षवेधीद्वारे मांडत चर्चेची मागणी केली. काँग्रेस सदस्यांनी तातडीने केलेली चर्चेची मागणी अध्यक्षांनी फेटाळली. त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी सरकारविरोधी घोषणा देत विधानसभाध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेतली. गदारोळ सुरू असतानाच अध्यक्षांनी गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सर्व २० आमदारांना एक दिवसासाठी निलंबित करण्याचा आदेश दिला.गारपीटग्रस्तांना महिन्याचे वेतन पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे झालेले नुकसान, घरांची पडझड आणि प्राणहानीबाबत चर्चेसाठी राजस्थान विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास निलंबित ठेवण्यात आला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, एनपीपी, बसपासारख्या विरोधी पक्षांनी पक्षभेद बाजूला सारत संकटग्रस्तांच्या मदतीसाठी एकजूट दाखविली. सर्वच आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन संकट मदतनिधीत जमा करण्याची घोषणा केली आहे. राजस्थान सरकारने पाऊस आणि गारपिटीमुळे घरे कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली.बिहार विधानसभेत धान खरेदीच्या मुद्यावरून विरोधकांनी नितीशकुमार यांच्या सरकारची कोंडी केली. धान खरेदी मंदगतीने सुरू असल्याबद्दल भाजपने जोरदार निषेध नोंदविला. धान खरेदीला गती द्यावी अशी मागणी करीत विरोधी पक्षनेते किशोर यादव यांनी स्थगनप्रस्ताव दिला असताना भाजपच्या सदस्यांनी हौद्यात धाव घेत सरकारविरुद्ध नारेबाजी केली. शून्य तासाला चांगला गदारोळ झाल्यानंतर कामकाज दुपारी २.३० पर्यंत तहकूब करण्यात आले होते. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतरही हीच परिस्थिती कायम राहिली.कॉन्स्टेबल भरती घोटाळ्यावरून गदारोळ ४कॉन्स्टेबल भरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या मुद्यावर विरोधी काँग्रेसने सोमवारी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या निवेदनाची मागणी करीत कामकाज ठप्प पाडले. ४सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी करीत हौद्यात धाव घेतली. जोरदार नारेबाजीमुळे सभागृहात तणाव निर्माण झाला होता. उत्तरप्रदेशात बसपाचा सभात्यागपाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात नुकसानीकडे लक्ष वेधताना बसपाच्या सदस्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत सभात्याग केला. भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी हौद्यात धाव घेत या मुद्यावर चर्चेची मागणी केल्यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ झाला.
विधिमंडळांचा बनला‘आखाडा’
By admin | Updated: March 16, 2015 23:34 IST