राज्यसभेमध्ये आज संविधानावर झालेल्या चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. अमित शाह या चर्चेदरम्यान म्हणाले की, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. इथे घराणेशाही असता कामा नये, भारत एक पंथनिरपेक्ष राष्ट्र आहे. येथे लांगुलचालनाला थारा असता कामा नये. काँग्रेसने नेहमी घराणेशाही, लांगुलचालन आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले. काँग्रेसने या तीन गोष्टी सोडल्या तर जनता त्यांना विजयी करेल, असा टोला अमित शाह यांनी लगावला.
काँग्रेसवर निशाणा साधताना अमित शाह म्हणाले की, प्रेमाच्या दुकानाच्या खूप घोषणा ऐकल्या आहे. प्रत्येक गावात दुकान उघडण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्यांची भाषणंही ऐकली आहेत. पण प्रेम ही कााही विकण्याची गोष्ट नाही. ती एक हिंमत आहे, जी अनुभवता येते.
यावेळी अमित शाह यांनी काँग्रेसवर नागरिकांच्या अधिकारांचं हनन करण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा आणि कच्छतिवू बेट रातोरात श्रीलंकेला दिल्याच आरोप केला. अमित शाह म्हणाले की, कच्छतिवू बेट आमचा भूभाग आहे. मात्र तो आज आमच्याकडे नाही आहे. काँग्रेसने संसदेत चर्चा न करता तो श्रीलंकेला देवून टाकला होता.
यावेळी अमित शाह यांनी भारतीय जनतेनं हुकूमशहांचा अहंकार मोडीत काढला असा टोला लगावला, शाह म्हणाले की, “गेल्या 75 वर्षांत अनेक देश स्वतंत्र झाले आणि त्यांनी नव्याने सुरुवात केली. मात्र तेथे लोकशाही यशस्वी ठरू शकली नाही. मात्र आपली लोकशाही खोलवर रुजलेली आहे. आपण रक्ताचा एक थेंबही न सांडता अनेक बदल केले आहेत. या देशातील लोकांनी अनेक हुकूमशहांचा अहंकार लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमाने मोडीत काढला आहे.”