"महिन्याभरात हिंदी शिक, नाहीतर..."; भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन फुटबॉल कोचला थेट अल्टीमेटम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 19:31 IST2025-12-22T19:29:15+5:302025-12-22T19:31:17+5:30
दिल्लीत एका मैदानावर मुलांना शिकवणाऱ्या परदेशी व्यक्तीला भाजप नगरसेविकेने इशारा दिला.

"महिन्याभरात हिंदी शिक, नाहीतर..."; भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन फुटबॉल कोचला थेट अल्टीमेटम
Delhi Viral Video: महाराष्ट्रात मराठी बोलण्याला विरोध करण्यावरुन विरोध केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या असताना आता तसाच काहीसा प्रकार देशाची राजधानी दिल्लीत घडला आहे. पूर्व दिल्लीतील भाजप नगरसेविका रेनू चौधरी यांनी एका आफ्रिकन नागरिकाला हिंदी भाषा न येण्यावरून भर चौकात धमकावले आहे. भाजप नगरसेविकेने "एक महिन्यात हिंदी शिका, नाहीतर हा पार्क खाली करा," असा इशारा दिल्याने नवा वाद ओढवला आहे.
दिल्लीच्या पटपडगंज भागातील एका सार्वजनिक उद्यानात एक आफ्रिकन नागरिक लहान मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देतो. तो गेल्या १५ वर्षांपासून भारतात राहत असल्याचे समजते. घटनेच्या वेळी तो मुलांना कोचिंग देत असताना नगरसेविका रेनू चौधरी तिथे पोहोचल्या. त्यांनी कोचच्या भाषेवर आक्षेप घेत सर्वांसमोर त्याच्यावर ओरडण्यास सुरुवात केली.
"इथे पैसे कमवताय तर हिंदी बोला"
व्हायरल व्हिडिओमध्ये रेनू चौधरी अत्यंत आक्रमक भाषेत कोचला इशारा दिला. "तू माझ्या बोलण्याकडे गांभीर्याने बघत नाहीयेस. अजून हिंदी का शिकला नाहीस? मी चेष्टा करत नाहीये, गांभीर्याने सांगतेय. जर याने पुढच्या एका महिन्यात हिंदी शिकली नाही, तर याच्याकडून पार्क काढून घ्या. तुम्ही इथला पैसा खाताय, तर तोंडातून हिंदी बोलायला शिका. आठ महिने झाले मी तुला सांगतेय," असं रेनू चौधरी म्हणाल्या. व्हिडिओच्या शेवटी त्या स्थानिक लोकांनाही दम भरताना दिसतात की, रात्री ८ वाजेपर्यंत पार्क बंद झाला पाहिजे आणि इथे कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही.
नगरसेविकेने दिले स्पष्टीकरण
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आणि टीकेचा भडिमार झाल्यावर रेनू चौधरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "महापालिकेच्या बहुतेक कर्मचाऱ्यांना इंग्रजी येत नाही. हा कोच १५ वर्षांपासून इथे राहतोय, तरी त्याला साधी हिंदी येत नाही, ज्यामुळे संवाद साधताना गैरसमज होतात," असं रेनू चौधरी म्हणाल्या. आपण त्याला धमकावले नसून संवाद सोपा व्हावा यासाठी हिंदी शिकण्याचा सल्ला दिला होता, असा दावा त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक नेत्यांनी आणि नागरिकांनी याला वंशभेदी वागणूक म्हटले आहे. फुटबॉल कोच मुलांना खेळ शिकवत असताना केवळ भाषेवरून अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे चुकीचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.