लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुंबईत २६ नोव्हेंबर १९९३ रोजीच्या दहशतवादी हल्ला खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून गाजलेले ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला, केरळ भाजपचे नेते सी. सदानंदन मास्टर आणि इतिहासाच्या अभ्यासक डॉ. मीनाक्षी जैन यांची राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी रात्री उशिरा याबाबतची अधिसूचना काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व सदस्यांचा व त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे. विशेषत: निकम यांचा त्यांनी विशेष गौरव केला.
राज्यसभेवर नियुक्त चारही सदस्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनंदन केले. या सदस्यांचे ज्ञान, अनुभव आणि कौशल्यामुळे संसदेचे कामकाज समृद्ध होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
निकम यांची कारकीर्दनामांकित वकील अशी ओळख असलेले ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांत सरकारची बाजू मांडून आरोपींना शिक्षा मिळवून दिली आहे. १९९३चा मुंबई बॉम्बस्फोट खटला, गुलशन कुमार खून खटला, खैरलांजी हत्याकांड, प्रमोद महाजन खून प्रकरण या खटल्यांत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उत्तर मुंबईमधून उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांना यश आले नव्हते.हर्षवर्धन श्रुंगला : अमेरिका, थायलंड या देशांत भारताचे राजदूत व बांगलादेशात उच्चायुक्त म्हणून काम केले.डॉ. मीनाक्षी जैन : दिल्ली विद्यापीठांतर्गत गार्गी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलेल्या जैन यांनी स्वदेशी शिक्षण व भाषांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.सदानंदन मास्टर : केरळमध्ये भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असलेले सदानंदन यांचे राज्यात पक्षवाढीसाठी मोठे योगदान आहे. युवा सशक्तीकरणावर मोठे काम.