पंतप्रधानांच्या हस्ते 'श्रमेव जयते' योजनेचा शुभारंभ

By Admin | Updated: October 16, 2014 13:41 IST2014-10-16T11:21:12+5:302014-10-16T13:41:52+5:30

देशातील मजुरांची परिस्थिती सुधारणे व कामगार कायद्यांमध्ये सुधारणा आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'श्रमेव जयते' योजनेचा शुभारंभ केला

Launch of 'Sharmev Jayate' scheme at the hands of the Prime Minister | पंतप्रधानांच्या हस्ते 'श्रमेव जयते' योजनेचा शुभारंभ

पंतप्रधानांच्या हस्ते 'श्रमेव जयते' योजनेचा शुभारंभ

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - देशातील मजुरांची परिस्थिती सुधारणे व कामगार कायद्यांमध्ये सुधारणा आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'पंडित दीनदयाळ उपाध्याय श्रमेव जयते' या योजनेचा शुभारंभ केला. दिल्लीतील विज्ञात भवनात हा सोहळा पार पडला. यावेळी श्रम सुविधा पोर्टल, लेबर इन्स्पेक्शन स्कीम तसेच पीएफसाठी कायमस्वरुपी अकाऊंट नंबरची योजनाही सुरू करण्यात आली. या योजनेचा संघटित व असंघटित क्षेत्रातील लाखो मजुरांना फायदा मिळणार आहे. 
आजपर्यंत आपण फक्त 'सत्यमेव जयते' ऐकत होतो, पण देशाच्या विकासासाठी 'श्रमेव जयतेही' तितकेच महत्वाचे आहे, असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. दुर्दैवाने देशात आज केवळ व्हाईट कॉलर लोकांना आदर मिळतो, श्रमिक लोकांना नव्हे. आपल्या अनेक समस्यांचे समाधान श्रमिकांमुळे होते, पण आपण त्यांना समाजात प्रतिष्ठा देत नाही. त्यामुळे  आपण आपला दृष्टिकोन बदलला पाहीजे असे सांगत समाजात श्रम करणा-यांचा गौरव करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
जे तांत्रिक शिक्षण घेतात त्यांच्याबाबत आपण हीन भावना निर्माण केली आहे, मात्र तीच दूर करण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन ही योजना सुरू केली आहे. श्रमेव जयते या योजनेचे नेतृत्व याच श्रेत्रातील तज्ज्ञांना दिले आहे. ज्यांनी केवळ आयटीआय (ITI)मधील शिक्षणाच्या जोरावर हजारो लोकांसाठी रोजगार निर्मिती केली त्यांनाच आपण या योजनेसाठी ब्रँड अम्बेसेडर बनवले आहे, असे त्यांनी सांगितले. 
या नव्या सुधारणेअंतर्गत कामगार फंडाची व्याप्ती वाढवण्यात आली असून कामगारांच्या प्रतिमहा किमान वेतनाची मर्यादा १५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच कामगारांना कमीत कमी एक हजार रुपये निवृत्तीवेतन मिळेल अशी तरतूदही आहे.
तसेच 'इन्स्पेक्टर राज मुक्त' व्यवस्थेकडे पाऊल टाकत देशातील सुमारे १८०० उद्योग निरीक्षकांना पंतप्रधानांकडून नव्या नियमांबाबत थेट संदेश पाठवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

Web Title: Launch of 'Sharmev Jayate' scheme at the hands of the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.