काश्मिरी पंडितांच्या मोर्चावर लाठीमार; हत्येनंतर तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 06:58 IST2022-05-14T06:58:15+5:302022-05-14T06:58:36+5:30
पंडिताच्या हत्येनंतर तणाव : कारवाईचा नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीकडून निषेध

काश्मिरी पंडितांच्या मोर्चावर लाठीमार; हत्येनंतर तणाव
श्रीनगर : काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यामध्ये राहुल भट (३५ वर्षे) या काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी गुरुवारी हत्या केली होती. त्याच्या निषेधार्थ काश्मिरी पंडितांनी शुक्रवारी काढलेला निषेध मोर्चा श्रीनगर विमानतळाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी या निदर्शकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेने काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला असून, मोर्चावरील पोलीस कारवाईचा काश्मिरी पंडितांनी, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी या पक्षांनी निषेध केला आहे.
राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ काश्मीरच्या विविध भागांमध्ये गुरुवारपासूनच मोर्चे काढले जात आहेत. बडगाम भागातून शुक्रवारी काश्मिरी पंडितांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवला. निदर्शकांनी माघारी जाण्यास नकार दिल्याने त्यांना पांगविण्यासाठी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. राहुल भट हा काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी होता.
त्याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांच्या जीविताचे रक्षण करण्यात जम्मू-काश्मीर प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप निदर्शकांनी केला. तसेच मोर्चावर केलेल्या कारवाईचाही त्यांनी निषेध केला आहे.
लाठीमाराची कारवाई लाजिरवाणी : ओमर अब्दुल्ला
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, योग्य मागणीसाठी काश्मिरी पंडितांनी काढलेल्या मोर्चावर लाठीमार करणे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याची केलेली कारवाई ही लाजिरवाणी घटना आहे.
काश्मिरी लोकांसाठी ही परिस्थिती नवीन नाही. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल काश्मिरी पंडितांचे रक्षण करू शकत नाहीत. त्यामुळे त्याचा निषेध करण्याचा काश्मिरी पंडितांना हक्क आहे.
पंडितांचे संरक्षण करण्यात सरकारला अपयश
n पीडीपी पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले की, काश्मिरी पंडितांना समर्थन देण्यासाठी बडगाम येथे जाण्यापासून पोलिसांनी मला रोखले व नजरकैदेत ठेवले.
n काश्मिरी पंडितांचे रक्षण करण्यात सरकारला अपयश आले आहे.
n काश्मिरी मुस्लीम व पंडितांनी एकमेकांच्या दु:खात सहभागी व्हावे, अशी भाजपची इच्छा नसल्यानेच मला निदर्शकांकडे जाण्यापासून रोखण्यात आले, असा आरोपही मेहबुबा मुफ्ती यांनी केला.