विजय माल्याच्या "किंगफिशर व्हिला"ची अखेर विक्री
By Admin | Updated: April 8, 2017 09:59 IST2017-04-08T09:12:48+5:302017-04-08T09:59:36+5:30
मद्यसम्राट विजय माल्याच्या मालकीचा कांदोळीतील "किंगफिशर व्हिला" 73.01 कोटी रुपयांना विकला गेल्याची माहिती समोर आली आहे.

विजय माल्याच्या "किंगफिशर व्हिला"ची अखेर विक्री
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - तब्बल 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात आश्रय घेतलेला मद्यसम्राट विजय माल्याच्या मालकीचा कांदोळीतील "किंगफिशर व्हिला" 73.01 कोटी रुपयांना विकला गेल्याची माहिती समोर आली आहे.
या लिलाव प्रक्रियेशी संबंधित असलेल्या एका वरिष्ठ अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, सिनेमा प्रॉडक्शन कंपनी विकिंग मीडिया अँड एंटरटेन्मेंटनं हा व्हिला एका खासगी व्यवहारांतर्गत खरेदी केला आहे. कंपनीचे मालक व तेलुगू अभिनेता सचिन जोशीने तब्बल 73.01 कोटी रुपयांना किंगफिशर व्हिला विकत घेतला आहे.
दरम्यान, बँकांनी व्हिलाची विक्री करुन माल्याला देण्यात आलेल्या कर्जातील एक हिस्सा वसूल केला आहे. माल्यानं किंगफिशर एअरलाइन्ससाठी कर्ज घेताना आपल्या ज्या मालमत्तेचा पुरावा जोडला होता, त्यामध्ये गोव्यातील या "किंगफिशर व्हिला"चाही समावेश होता.
यापूर्वी बँकांकडून "किंगफिशर व्हिला"ची विक्रीसाठी तिनदा लिलावाचे प्रयत्न झालेत, मात्र यात कोणतेही यश त्यांना मिळाले नव्हते. ऑक्टोबर 2016मध्ये हा व्हिला विकण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. पहिल्या लिलावाच्यावेळी प्राथमिक बोली 85.29 कोटी रुपये होती. कांदोळीतील किंगफिशर व्हिला डिसेंबरमध्ये झालेल्या लिलांवात ८१ कोटी रुपये प्राथमिक बोली लावली होती ती दहा टक्क्यांनी कमी करण्यात आली.
मात्र तरीही लिलाव काही केल्या यश येईना. अखेर मार्च 2017मध्ये किंमत घटवून 73 कोटी रुपये करण्यात आली. आणि या प्रयत्नांना यश आले या व्हिलामध्ये मल्ल्या यानी अनेकदा बड्या पार्ट्या झोडलेल्या आहेत. माल्याला कर्ज देणा-या 17 बँकांकडून 9,000 कोटी रुपयांची वसुली करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये मुंबईतली किंगफिशर हाऊसही विकण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
विले-पार्लेतील किंगफिशर हाऊसच्या बाबतीत डिसेंबरमध्ये झालेल्या याआधीच्या लिलावात ११५ कोटी लावली होती. गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रथम ही मालमत्ता विक्रीस काढण्यात आली तेव्हा १५0 कोटी रुपये प्राथमिक बोली होती. दुसऱ्यावेळी लिलावात ती कमी करून १३५ कोटी रुपये करण्यात आली. हे किंगफिशर हाऊस १७ हजार चौरस फूट जागेत आहे. भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय, बँक आॅफ बडोदा, फेडरल बँक, एक्सिस बँक आदी बँकांचे मिळून सुमारे ९ हजार कोटी रुपये कर्ज मल्ल्या देणे असून गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून त्यांनी इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेला आहे.