चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अजून खूप काही करता आले असते
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 23:08 IST2018-09-03T23:07:52+5:302018-09-03T23:08:05+5:30
मोदी सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. तथापि, गेल्या चार वर्षांत आणखी बरेच काही करता आले असते, असे प्रतिपादन पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य शमिका रवी यांनी केले आहे.

चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अजून खूप काही करता आले असते
नवी दिल्ली : मोदी सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. तथापि, गेल्या चार वर्षांत आणखी बरेच काही करता आले असते, असे प्रतिपादन पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य शमिका रवी यांनी केले आहे.
शमिका रवी म्हणाल्या की, मोदी सरकारने वस्तू व सेवाकर आणि नादारी व दिवाळखोरी संहिता आणली. थेट परकीय गुंतवणुकीत बराच सोपेपणा आणला. तथापि, मला वाटते की, देशाला मोठ्या आर्थिक सुधारणांची भूक आहे. आम्ही अजून बरेच काही करू शकलो असतो.
आर्थिक आघाडीचा विचार करता मोदी यांची लोकांनी केलेली निवड ही विकास व आर्थिक सुधारणांसाठी होती. सरकार उदारीकरणावर आणखी खूप काही करू शकले असते. आयटीडीसी हॉटेल ते एअर इंडियापर्यंत अनेक सार्वजनिक उपक्रमांची विक्री करणे शक्य होते.
एका प्रश्नाच्या उत्तरात शमिका राव यांनी सांगितले की, सध्या जगात भडकलेले व्यापारी युद्ध भारतासाठी मोठी संधी आहे. जागतिक व्यापारातील दरी भरून काढण्यासाठी आपण हालचाली करायला हव्यात. जागतिक बाजाराशी स्पर्धा करता यावी यासाठी भारताला आपल्या कंपनी कराचे दर कमी करून व्हिएतनामसारख्या देशांच्या बरोबरीत आणावे लागतील.