पाच वर्षात देश घाणमुक्त करण्याचं नरेंद्र मोदींचं नागरिकांना साकडं
By Admin | Updated: August 15, 2014 10:22 IST2014-08-15T10:22:14+5:302014-08-15T10:22:14+5:30
महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीच्या वर्षी २०१९ पर्यंत संपूर्ण देश घाणमुक्त करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

पाच वर्षात देश घाणमुक्त करण्याचं नरेंद्र मोदींचं नागरिकांना साकडं
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - हा देश स्वच्छ करण्याचा संकल्प या देशातल्या १२५ कोटी लोकांनी उचलायला हवा असे आवाहन करत २०१९ या महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीच्या वर्षी संपूर्ण देश घाणमुक्त करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. या देशातला प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली, प्रत्येक मोहल्ला, प्रत्येक मंदीर, प्रत्येक शाळा, प्रत्येक हॉस्पिटल स्वच्छ असायला हवं असं आवाहन त्यांनी केलं. आपल्या देशातल्या लाखो महिलांना आजही उघड्यावर शौचाला जायला लागतं ही लज्जास्पद बाब असल्याचं सांगत मोठ्या प्रमाणावर शौचालयं उभारण्याचं आवाहन त्यांनी केलं. विशेष म्हणजे कंपन्यांना आवाहन करताना त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत शाळा शाळांमध्ये मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्याचे आवाहन केले. भारतात अशी स्वतंत्र शौचालये नसलेली एकही शाळा असता कामा नये अशी इच्छा मोदींनी व्यक्त केली.
स्वच्छता हा राष्ट्रीय धोरणाचा भाग असायला हवा असं नमूद करताना मोदींनी प्रत्येकानं यात सहभागी व्हावं असं आवाहन केलं. मी घाण करणार नाही, अस्वच्छता करणार नाही असं सव्वाशे कोटी लोकांनी ठरवलं तर हा देश घाणमुक्त होईल असं सांगत लोकांच्या स्वयंसहभागाशिवाय हे शक्य नसल्याचंही सूचित केलं.