म्यानमार आणि बँकॉकमध्ये दोन दिवसांपूर्वी भीषण भूकंप आला आहे. याचे धक्के तीन दिवस बसत आहेत. अशातच परवाच्या भूकंपाचे धक्के भारतापर्यंत जाणवले होते. यामुळे भारतातील जमीन देखील हादरली आहे. याचा पहिला अपघात हिमाचल प्रदेशमध्ये झाला आहे. मणिकर्णमध्ये पर्यटकांची वाहने जात असताना त्या ठिकाणी भूस्खलन झाले, यात कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
जखमींना कुल्लूच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. या भूस्खलनामुळे मणिकर्ण ते कसोल रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता सुरु करण्यासाठी प्रशासन काम करत असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
डोंगरातील झाड कोसळल्याने हे भूस्खलन झाल्याचे जिल्हा पोलिसांनी सांगितले आहे. मृतांमध्ये तीन पर्यटक आहेत. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. काही लोक जखमी झालेले आहेत. झाड टेकडीवरून खाली पडले तेव्हा सोबत मोठमोठाले दगडही खाली आले. भूस्खलनामुळे झाड मुळांसह डोंगरावरून खाली कोसळले आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात ढिगाराही खाली आला. या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हो लोक या भागात असलेल्या स्टॉलवर थांबलेले होते. स्टॉलवाले तिघाजणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
फेब्रुवारी महिन्यातही कुल्लू जिल्ह्यातील मणिकरण खोऱ्यातील तोष गावातील जीरा नाल्याचे पाणी भूस्खलनामुळे अडले होते. यामुळे कपिल मोहन जलविद्युत प्रकल्प धोक्यात आला होता. नाल्यालगतच्या संवेदनशील भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले होते. तेव्हा टेकडीवर खूप पाऊस पडला होता. आता तसे काहीच कारण नव्हते.