४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:14 IST2025-11-07T13:11:42+5:302025-11-07T13:14:14+5:30
माहीमच्या अल हुसैनी इमारतीतील फ्लॅट ज्याचा वापर १९९३च्या बॉम्बस्फोटांचा कट रचण्यासाठी करण्यात आला होता, त्याचा देखील आता लिलाव होणार आहे.

४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
१९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित प्रमुख दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी केंद्र सरकारने पुन्हा सुरू केली आहे. दहशतवादी कारवायांतून मिळवलेल्या बेकायदेशीर मालमत्तांवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या सरकारच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे.
केंद्रीय संस्था सध्या दाऊद आणि मेमन कुटुंबांच्या मालमत्तांची यादी बनवत आहेत. यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणच्या घरांचा आणि जमिनीचा समावेश आहे.
दाऊदची मालमत्ता विकायला काढली पण...
दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरातील चार मालमत्तांचा लिलाव करण्याचा प्रयत्न नुकताच करण्यात आला. मात्र, अंदाजे २० लाख रुपये किंमत असूनही, यावेळीही एकही खरेदीदार पुढे आला नाही. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या जमिनी विकण्याचा हा पाचवा प्रयत्न होता. यापूर्वी एका व्यक्तीने एका छोट्या जमिनीसाठी २ कोटींची बोली लावून नंतर करार पूर्ण न केल्यामुळे त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले होते.
आता टायगर मेमनच्या मालमत्तेचा लिलाव
आता सरकार टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबाच्या मालमत्तांचा लिलाव करणार आहे. मेमन कुटुंबाकडे माहीम, वांद्रे, वाकोला आणि दक्षिण मुंबई येथे अनेक मालमत्ता आहेत. सर्वात महत्त्वाची म्हणजे, माहीमच्या अल हुसैनी इमारतीतील फ्लॅट ज्याचा वापर १९९३च्या बॉम्बस्फोटांचा कट रचण्यासाठी करण्यात आला होता, त्याचा देखील आता लिलाव होणार आहे. स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स अॅक्ट अथॉरिटी अर्थात SAFEMAने इतर आठ मालमत्तांसह हा फ्लॅट ताब्यात घेतला असून, त्याचे मूल्यांकन सुरू आहे.
कोणकोणत्या संपत्तीचा लिलाव होणार?
> माहीममधील अल हुसैनी इमारतीतील तीन फ्लॅट्स (येथे कटाची योजना झाली).
> वाकोला येथील १०,००० चौरस मीटर जमीन, ज्याची किंमत अंदाजे ₹४०० कोटी आहे (सध्या अतिक्रमण झालेले).
> दक्षिण मुंबईतील जवेरी बाजार, वांद्रे आणि कुर्ला येथील फ्लॅट्स.
SAFEMAला टाडा कोर्टाने मेमन कुटुंबाच्या १७ मालमत्तांची माहिती दिली आहे, त्यापैकी ८ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
कधी सुरू होणार लिलाव?
सध्या या मालमत्तांचे मूल्यांकन सुरू असून, लिलाव प्रक्रिया डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
सीबीआयच्या माहितीनुसार, १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा कट याच अल हुसैनी बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये रचण्यात आला होता. या स्फोटानंतर टायगर मेमन फरार झाला आणि तो पाकिस्तानात लपून बसल्याचे म्हटले जाते. त्याचा भाऊ याकूब मेमन याला २०१५ मध्ये फाशी देण्यात आली आहे.
लिलावामागचे उद्दिष्ट काय?
केंद्रीय संस्थांचे म्हणणे आहे की, या मालमत्तांचा लिलाव करून दहशतवादाशी संबंधित बेकायदेशीर मालमत्तांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या लिलावातून मिळणारे उत्पन्न राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक कल्याणासाठी वापरले जाणार आहे.