"बाबांना काही झालं तर कुणालाच सोडणार नाही", लालूंची कन्या CBI चौकशीवरुन संतापली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 13:27 IST2023-03-07T13:26:29+5:302023-03-07T13:27:30+5:30
केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयनं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मंगळवारी जवळपास अडीच तास चौकशी केली.

"बाबांना काही झालं तर कुणालाच सोडणार नाही", लालूंची कन्या CBI चौकशीवरुन संतापली!
नवी दिल्ली-
केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयनं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मंगळवारी जवळपास अडीच तास चौकशी केली. ही चौकशी IRCTC घोटाळा म्हणजेच लँड फॉर जॉब स्कॅम संदर्भात करण्यात आली. सीबीआयचं पथक लालूंच्या चौकशीसाठी मिसा भारती यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी पोहोचलं होतं. लालू सध्या याच ठिकाणी वास्तव्याला आहेत. याआधी सीबीआयनं सोमवारी पाटणामध्ये राबडी देवी यांची चार तास चौकशी केली.
सीबीआयकडून लालू आणि राबडींच्या चौकशीबाबत त्यांची मुलगी रोहिणी हिनं ट्विट केलं आहे. "बाबांना सातत्यानं त्रास दिला जात आहे. जर त्यांना काही झालं तर मी कुणालाच सोडणार नाही. बाबांना त्रास दिला जात आहे ही चांगली गोष्ट नाही. हे सगळं मी लक्षात ठेवेन. वेळ सर्वात प्रबळ असतो. यातच सर्वात मोठी ताकद असते हे लक्षात ठेवा", असं रोहिणी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सीबीआयनं लालूंना पाठवलं समन्स
सीबीआयनं लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी लालू प्रसाद यादव यांना समन्स धाडले होते. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यात सहभाग असल्याच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे.