भारताच्या शेजारी देशांसारखेच हिंसक आंदोलन लेहमध्ये सुरु झाले असून विद्यार्थी, तरुण पिढीने आज पोलिसांच्या गाड्यांसह भाजपाचे ऑफिस जाळले आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले होते. या हिंसक आंदोलनामुळे आपण उपोषण सोडत असल्याचे वांगचूक यांनी स्पष्ट केले.
५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केले, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरचा पूर्ण राज्यत्व संपुष्टात आला. त्यानंतर, जम्मू आणि काश्मीर एक वेगळा केंद्रशासित प्रदेश बनला. लेह आणि कारगिलचे एकत्रीकरण करून लडाखला एक वेगळा केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण करण्यात आले. तेव्हापासून लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी वांगचूक हे विविध मार्गांनी आंदोलन करत आहेत.
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. निदर्शकांची पोलिसांशी झटापट झाली, दगडफेक झाली आणि सीआरपीएफच्या एका वाहनालाही आग लावण्यात आली. निदर्शक भाजप कार्यालयाबाहेरही निदर्शने करत आहेत. वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील लडाखची सर्वोच्च संस्था लडाखला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. लडाख बंद दरम्यान आज लेहमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
या हिंसक आंदोलनानंतर वांगचुक यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच केंद्र सरकारने आतातरी या जेन झेड पिढीचा आवाज ऐकावा असे आवाहन केले. "हा लडाखसाठी दुःखद दिवस आहे. आम्ही पाच वर्षांपासून शांततेच्या मार्गावर चालत आहोत. आम्ही उपोषण केले, लेह ते दिल्लीपर्यंत पायी चाललो. आज, आम्ही शांतीचा संदेश अपयशी होताना पाहत आहोत. हिंसाचार, गोळीबार आणि जाळपोळ होत आहे. मी लडाखच्या तरुण पिढीला हे थांबवण्याचे आवाहन करतो. यामुळे परिस्थिती आणखी बिकट होईल. मी प्रशासनाला गोळीबार थांबवण्याचे आवाहन करतो. आम्हाला लडाख आणि देशात अस्थिरता नको आहे'', असे सांगत उपोषण सोडत असल्याची घोषणा वांगचूक यांनी केली.
तसेच आमच्या उपोषणाला समर्थनार्थ ही तरुण पिढी रस्त्यावर उतरली आहे, आम्हाला पूर्ण लडाखचा पाठिंबा आहे. या तरुणांना गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळी कारणे देऊन नोकऱ्या देण्यात येत नाहीएत. ते बेरोजगार आहेत. आज जे झाले तो तरुणांचा राग होता. जेन झेडची क्रांती होती. आमच्या सांगण्यावरून हे करण्यात आले नाही. केंद्र सरकारने आतातरी या तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वांगचुक यांनी केली.