Kumbh Mela 2025 News: कुंभमेळ्यासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसला आग लागल्याची घटना मंगळवारी (१४ जानेवारी) रात्री घडली. यात एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. बसमधून ५० भाविक प्रवास करत होते. बस एका ठिकाणी थांबली होती. त्याचवेळी बसने पेट घेतला. सिगारेटमुळे बसला आग लागली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बसमधून जवळपास ५० भाविक प्रवास करत होते. हे लोक रात्री पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराजला निघाले होते. १४ जानेवरी रोजी सांयकाळी भाविकांची बस वृंदावन पर्यटन केंद्राजवळ थांबली होती.
बसमधील काही भाविक जवळच्या मंदिरात दर्शनासाठी गेले, तर काही जण जेवण तयार करण्यासाठी उतरले होते.
मथुराचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद कुमार यांनी सांगितले की, बसमधून अचानक ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणातच आग भडकली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला बोलवण्यात आले.
दरम्यान, खाली उतरलेल्या भाविकांपैकी एकाने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. ध्रुपती नावाची एक व्यक्ती बसमध्येच असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर बसमध्ये शोध घेतला असता त्या भाविकाचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ बसून जो भाविका प्रवास करत होता, त्याने सांगितले ध्रुपती सिगारेट पीत होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
मथुराचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलैष पांडेय यांनी सांगितले की, हे भाविक तेलंगणाचे असून, त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. रात्री राहण्याठी त्यांना चादरी देण्यात आल्या. मोफत बसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. घरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना लागणारे पैसेही त्यांना दिले जाणार आहेत.