'कुमार विश्वास यांनी सरकार पाडण्याचा कट रचल्यानं राज्यसभेवर पाठवलं नाही', आपचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 11:10 IST2018-01-05T08:02:48+5:302018-01-05T11:10:46+5:30
राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित झाल्यानंतरही आम आदमी पार्टीतील अंतर्गत वाद थांबण्याचं नाव घेत नाहीय.

'कुमार विश्वास यांनी सरकार पाडण्याचा कट रचल्यानं राज्यसभेवर पाठवलं नाही', आपचा गंभीर आरोप
नवी दिल्ली - राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित झाल्यानंतरही आम आदमी पार्टीतील अंतर्गत वाद थांबण्याचं नाव घेत नाहीय. आम आदमी पार्टीनं पहिल्यांदा जाहिररित्या कुमार विश्वास यांच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले नाही, असा गंभीर आरोप आदमी पार्टीनं केला आहे.
राज्यसभेमध्ये बाहेरील दोन उमेदवारांना का पाठवण्यात आले?, यावर आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाळ राय यांनी पार्टीतील कार्यकर्त्यांना फेसबुक लाइव्हदरम्यान स्पष्टीकरण दिले.
नेमकं काय म्हणाले गोपाळ राय?
जो आम आदमी पार्टीचं सरकार पाडण्यासाठी आमदारांना फोडण्याच्या षड्यंत्रात सहभागी असेल, जो जाहिररित्या प्रत्येक व्यासपीठाहून पार्टीविरोधात विधानं करत असेल, त्या व्यक्तीला राज्यसभेवर कसं पाठवलं जाऊ शकतं? ती व्यक्ती पार्टीचा आवाज होईल कि पार्टीला संपवण्यासाठी काम करेल? अशा व्यक्तीला राज्यसभेवर पाठवायला हवं? मला असं वाटतं की अजिबात पाठवलं जाऊ नये. यासाठी पार्टीनं हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीही कुमार विश्वास यांच्यावर सरकार पाडण्याचं षड्यंत्र रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीदरम्यान आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी विश्वास यांना भाजपाचे एजंट म्हणत केजरीवाल सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. यानंतर नाराज झालेल्या कुमार विश्वास यांची मनधरणी करण्यात आली होती. यानंतर केजरीवाल यांनी कपिल मिश्रा यांना मंत्रिपदावरुन हटवलं होतं.
याच पार्श्वभूमीवर गोपाळ राय यांनी आरोप केले आहेत की, ज्या पद्धतीनं दिल्लीतील आप सरकारल पाडण्याचं संपूर्ण षड्यंत्री रचण्यात आले, त्याचं केंद्र कुमार विश्वास होते. या षड्यंत्रासंदर्भात सर्वाधिक बैठका कुमार विश्वास यांच्या निवासस्थानीच होत होत्या, असा गौप्यस्फोटही राय यांनी केला आहे.