श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या कुलगाम येथे सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत ५ दहशतवादी ठार झाले आहेत. या इन्काऊंटरमध्ये २ जवानही जखमी झालेत. चकमकीनंतर सुरक्षा दलाने परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. कुलगाम जिल्ह्यातील बेहीबाग पीएसमधील कद्दर गावात ही चकमक सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला.
इंडियन आर्मीच्या चिनार कॉर्प्सने याबाबत माहिती दिली की, कद्देर गावाच्या आसपास काही दहशतवादी असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली त्यानंतर भारतीय सैन्याने कुलगाम परिसरात सर्च ऑपरेशन राबवले. त्यात सैनिकांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या तितक्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद फायरिंग केली त्याला सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर येथे दहशतवादी कारवाई समोर आली होती. ज्यात सुरक्षा दलाने घाटीत शोध मोहिम वेगाने सुरू केली होती.
२ महिन्यापूर्वी ऑक्टोबरला जम्मूच्या अखनूर परिसरात सुरक्षा दलाने ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यावेळी दहशतवाद्यांनी सैन्य दलाच्या ताफ्यावर नियोजनपूर्वक हल्ला केला होता त्यानंतर सुरक्षा जवानांनी या परिसरात ऑपरेशन सुरू केले. यात ३ दहशतवादी मारले गेले. मृत दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. सैन्य दलाची एक रुग्णवाहिका गावातून जात होती तेव्हा गावात गोळीबाराचा आवाज ऐकायला आला जी सैन्य दलाच्या वाहनावर चालवण्यात येत होता.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला मध्य काश्मीरमधील गंगानगीरमध्ये बोगदा बांधण्याच्या ठिकाणी हल्ला झाला होता. या प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेला लष्कर-ए-तैयबा दहशतवादी श्रीनगरमधील जंगल परिसरात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारला गेला होता. श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गासाठी बोगद्याचं काम सुरू आहे. त्यावेळी सात निशस्त्र लोक, मजूर आणि कर्मचारी संध्याकाळी छावणीच्या ठिकाणी परतल्यानंतर दहशतवाद्यांनी गुंड भागातील गंगानगीर इथं अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता.