हेग: पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारताच्या बाजूनं निकाल दिला आहे. जाधव यांच्या शिक्षेला देण्यात आलेली स्थगिती न्यायालयानं कायम ठेवली आहे. याशिवाय जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश पाकिस्तानला न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात वरिष्ठ वकील हरिश साळवेंनी भारताची बाजू मांडली. न्यायालयात हरिश साळवेंनी केलेला युक्तिवाद अतिशय महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच १६ न्यायाधीशांच्या खंडपीठानं १५-१ असा निकाल दिला आणि भारताला मोठा दिलासा मिळाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर हरिश साळवे पुन्हा एकदा चर्चेत आले. देशातील प्रख्यात वकिलांपैकी एक असलेल्या साळवेंची एक दिवसाची फीज २५-३० लाख रुपये असल्याचं बोललं जातं. मात्र त्यांनी कुलभूषण प्रकरणात भारताची बाजू मांडण्यासाठी केवळ १ रुपया घेतला. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना त्यांना ट्विटरवर एकानं याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी स्वराज यांनी साळवे घेत असलेल्या फीजची माहिती दिली होती.
Kulbhushan Jadhav: हरिश साळवेंनी किती मानधन घेतलं; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 19:54 IST