Kota Crime:राजस्थानमधील कोटा शहरात शुक्रवारी रात्री जोडप्याने प्रचंड गोंधळ घातला. २२ वर्षीय तरुणाने दारू पिऊन १७ वर्षीय मुलीचे तिच्या घरातून अपहरण केले. जेव्हा पोलिस त्याला अटक करण्यासाठी आले, तेव्हा दोघे जीपच्या छतावर चढले आणि गोंधळ घातला. यावेळी त्या तरुणाने पोलिसांना शिवीगाळ केली, तर मुलीने माफी मागितली. शेवटी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, रामपुरा पोलिस स्टेशन परिसरातील सबजी मंडी रोडवर रात्री उशिरा पोलिस गस्त घालत होते. यावेळी सरोवर टॉकीजजवळ उभे असलेला तरुण आणि तरुणी पोलिसांना पाहून पळाले. संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत पकडले. मात्र, गाडीत बसण्याऐवजी ते दोघे पोलिस जीपच्या छतावर चढले. यावेळी दारू प्यायलेल्या मुलाने पोलिसांना शिवीगाळ आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली, तर मुलगी "त्याला सोडा, तो चुकीचा नाही," अशी पोलिसांना विनवणी करत होती.
कसेबसे पोलिसांनी दोघांना खाली उतरवले आणि ताब्यात घेतले. तपासात आढळले की, २२ वर्षीय तरुणाने दारुच्या नशेत त्या अल्पवयीन मुलीला घरातून पळवून आणले होते. मुलीच्या कुटुंबाने आधीच नांता पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्या मुलाविरोधात कलम ३६३, कलम ३६६ आणि पोक्सो कायद्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.