आई वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी बायको करते हट्ट?; हायकोर्टानं सुनावला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 12:39 IST2023-04-10T12:38:41+5:302023-04-10T12:39:51+5:30
पत्नीच्या घटस्फोट याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे विधान केले आहे

आई वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी बायको करते हट्ट?; हायकोर्टानं सुनावला निकाल
कोलकाता - पती-पत्नीच्या घटस्फोट याचिकेवर हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. एका पतीला पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. जर पत्नी पतीचा मानसिक छळ करत असेल. त्याला त्रास देत असेल त्याचसोबत पतीला कुठल्याही ठोस कारणाशिवाय आई वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी दबाव टाकत असेल तर पतीला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे असं हायकोर्टाने म्हटलं आहे.
पत्नीच्या घटस्फोट याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे विधान केले आहे. फॅमिली कोर्टाने पतीचा घटस्फोट मंजूर केला होता. मात्र या कोर्टाच्या आदेशाला पत्नीने हायकोर्टाने आव्हान दिले. या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी म्हटलं की, आई वडिलांची काळजी घेणे ही मुलाची जबाबदारी आहे. भारतात लग्नानंतर मुलाने आई वडिलांसह राहणे सामान्यबाब आहे असंही कोर्टाने सांगितले आहे.
क्रूरतेच्या आधारे पतीला मिळाला घटस्फोट
२००९ मध्ये पश्चिम मिदनापूर येथे एका फॅमिली कोर्टाने पतीला पत्नीच्या क्रूरतेचा दाखला देत घटस्फोट मंजूर केला होता. या दाम्पत्याचे लग्न २००१ मध्ये झाले होते. पतीच्या आरोपानुसार, पत्नी सार्वजनिकरित्या बदनामी करते. पती व्यवसायाने शिक्षक आहे परंतु त्याची कमाई कमी असल्याने घरखर्च चालवण्यासाठी पुरेसे नाही. कुटुंबात मुलांसह आई वडीलही राहतात. पत्नी दबाव टाकून दुसरीकडे फ्लॅट घेण्याचा आग्रह धरत आहे. पतीला तो खर्च परवडणारा नाही हेदेखील तिला माहिती आहे. पतीला सरकारी नोकरी मिळणार होती तेव्हा त्याच्यावर गुन्हेगारी खटला दाखल केला. त्यामुळे त्याची सरकारी नोकरी गेली.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हवाला
कोर्टाने म्हटलं की, पत्नी कुठल्याही ठोस कारणाशिवाय पतीला आई वडिलांपासून दूर राहण्यासाठी दबाव टाकते. ही एकप्रकारची क्रूरता आहे. कोर्टाने २०१६ मधील सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचा दाखला दिला. ज्यात एका पत्नीने पतीवर दबाव टाकून आई वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी छळ केला. त्यावर पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यावर घटस्फोटासाठी हे कारण पुरेसे आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. वारंवार पतीला आई वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी हट्ट करणे, ही क्रूरता असून कोर्टाने पत्नीची याचिका फेटाळून लावली आहे.