देशात गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलनाबाबत कोणत्याही प्रकारची टीका टिपण्णी किंवा ट्वीट करण्यापूर्वी त्या प्रकरणाचं सत्य जाणून घेणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. "अशा प्रकरणांवर कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करण्यापूर्वी तथ्य जाणून घंणं आवश्यक आहे, तसंच याबाबत अधिक समज असणंही आवश्यक आहे. या प्रकरणी प्रसिद्ध व्यक्तींकडून आणि अन्य व्यक्तींकडून सोशल मीडियावर हॅशटॅगचा होत असलेला वापर आणि तसंच जी काही वक्तव्य केली जात आहेत ती योग्य नाही आणि बेजबाबदारपणाची आहेत," असं अनुराग श्रीवास्तव म्हणाले. संसदेत पूर्ण चर्चा करण्यात आल्यानंतरच कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी हे कायदे पारित करण्यात आय़ले आहे. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसंच शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. या नव्या कायद्यांबाबत फार कमी लोकांमध्ये असंतोष असल्याचंही या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे."आंदोलकांच्या भावनांचा आदर करत सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांकडून आतापर्यंत ११ वेळा बैठक घेण्यात आली. सरकारनं आतापर्यंत शेतकऱ्यांना हा कायदा तात्पुरता रोखून ठेवण्याचा पर्याय देखील दिला आहे," असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
"वक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या"; ग्रेटा थनबर्ग, रिहानाच्या ट्वीटवर परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 14:53 IST
ग्रेटा थनबर्ग आणि रिहानानं केलं होतं शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट
वक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या; ग्रेटा थनबर्ग, रिहानाच्या ट्वीटवर परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर
ठळक मुद्देवक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घेणं आवश्यक, परराष्ट्र मंत्रालयाचं ट्वीटरिहाना, ग्रेटा थनबर्गनं शेतकरी आंदोलनाला दिलं होतं समर्थन