१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:04 IST2025-05-03T16:04:51+5:302025-05-03T16:04:51+5:30
Vande Bharat Train Income: भारतात सर्वांधिक लोकप्रिय झालेल्या वंदे भारत ट्रेनमधून भारतीय रेल्वेची किती कमाई होते, याबाबतची माहिती अधिकारात माहिती देण्यात आली.

१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
Vande Bharat Train Income: भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणारी ट्रेन म्हणजे वंदे भारत. हायस्पीड प्रकारात मोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनची क्रेझ अद्यापही प्रवाशांमध्ये कायम आहे. भारतीय रेल्वेच्या सर्वांत लोकप्रिय ट्रेनमध्ये वंदे भारत ट्रेनचा वरचा क्रमांक लागतो. वंदे भारत ट्रेनच्या शेकडो सेवा देशभरात सुरू आहेत. या वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून भारतीय रेल्वेची नेमकी किती कमाई होते, याबाबत माहिती अधिकारात प्रश्न विचारण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रहिवासी चंद्रशेखर गौर यांनी याबाबत अर्ज दाखल केला होता. या माहितीच्या अधिकार अर्जाला उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने धक्कादायक माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रत्येक ट्रेनच्या कमाईचे वेगळे रेकॉर्ड ठेवले जात नाहीत. रेल्वे विभाग ट्रेननिहाय महसूल वेगळा काढत नाही. त्यामुळे वंदे भारत किंवा शताब्दी सारख्या विशिष्ट ट्रेनमधून नेमके किती उत्पन्न भारतीय रेल्वेला मिळते, हे स्पष्टपणे सांगता येत नाही.
या आर्थिक वर्षात उत्पन्नात १६ टक्के वाढ होण्याचा अंदाज
वंदे भारत एक्सप्रेस सध्या १३२ मार्गांवर धावत आहे. देशातील २४ राज्ये आणि २८४ जिल्ह्यांना वंदे भारत ट्रेन जोडते. आतापर्यंत दोन कोटींहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे. प्रवाशांची संख्या आणि प्रवास केलेल्या अंतराची माहिती उपलब्ध असली तरी, यातून मिळणाऱ्या महसुलाची माहिती रेल्वेकडे नाही, असे म्हटले जात आहे. तसेच भारतीय रेल्वेने एका जुन्या माहिती अधिकाराच्या उत्तरात असेही सांगितले आहे की, वंदे भारत ट्रेनच्या सरासरी ९२ टक्के जागा आरक्षित केल्या जातात. हा दर इतर अनेक एक्सप्रेस ट्रेनपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात प्रवासी उत्पन्नात १६ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वेच्या प्रवासी उत्पन्नात वंदे भारत ट्रेन, शताब्दी, राजधानी आणि इतर प्रीमियम ट्रेनचे योगदान महत्त्वाचे मानले जात आहे. वंदे भारत किंवा शताब्दी ट्रेनमधून किती महसूल मिळाला हे वेगळे सांगता येत नाही. वंदे भारत आणि शताब्दी यांसारख्या ट्रेनचा वेग आणि आधुनिकता ही निश्चितच रेल्वेची मोठी कामगिरी आहे. त्यांच्याशी संबंधित उत्पन्नाची नेमकी माहिती मिळू शकत नाही.