जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या घटनेमुळे मोठा हाहाकार निर्माण झाला आहे. आतापर्यंत १२ जणांच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे. दरम्यान, हा आकडा आणखीही वाढण्याची भीती आहे. कारण, ज्या चिसोटी गावात ही घटना घडली, ते चिसोटी गाव मचैल माता यात्रेच्या मार्गावर येते. येथे मोठ्या संख्येने यात्रेकरू आपले बेस कॅम्प बनवून तंबू उभारतात. आताही येथे शेकडो बाहेरून आलेले लोक असल्याचे वृत्त आहे. याशिवाय, गावातही मोठ्या प्रमणावर लोक राहतात. चिंतेची गोष्ट म्हणजे, सुमारे अर्धे गाव वाहून गेले असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा विनाश किती मोठा असेल? याचा अंदाज लावणेही कठीण आहे.
या संदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, ते एक मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. अर्धे गाव वाहून गेल्याचे मी ऐकले आहे. याचा अर्थ मोठे नुकसान होण्याची भीती आहे. मी देशभरातील जनतेला, अधिक नुकसान होऊ नये यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करेन.
अब्दुल्ला पुढे म्हणाले, सध्या ज्या पद्धतीचे हवामान आहे, त्या परिस्थितीत हेलिकॉप्टरने बचावकार्य करणे अशक्य आहे. रुग्णवाहिकेनेच ऑपरेशन सुरू करावे लागेल. सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे बचावकार्यातही अडचणी येतील. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानीची भीती -याबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, या घटनेबाबत मला जम्मू काश्मीर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांनी माहिती दिली. त्यानंतर मी किश्तवाडचे उपायुक्त पंजक कुमार शर्मा यांच्याशी दुर्घटनेबाबत चर्चा केली. चिशोटी परिसरात ढगफुटीची मोठी घटना घडली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असण्याची भीती आहे. बचाव पथकाला घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहे. तसेच झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठीही व्यवस्था केली जात आहे.