गरीबांसाठी 'रोटी बँक' चालवणाऱ्या किशोर कांत यांचं निधन; दोन दिवसांपूर्वी कोरोनाचं झालं होतं निदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 13:03 IST2021-04-16T13:02:17+5:302021-04-16T13:03:26+5:30
२०१७ मध्ये त्यांनी गरीबांसाठी 'रोटी बँक' सुरू केली होती.

गरीबांसाठी 'रोटी बँक' चालवणाऱ्या किशोर कांत यांचं निधन; दोन दिवसांपूर्वी कोरोनाचं झालं होतं निदान
वाराणसीत ‘रोटी बँक’ सुरू करून गरीबांचं पोट भरणारे सामाजिक कार्यकर्ते किशोरकांत तिवारी यांचं गुरूवारी निधन झालं. काही दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना रविंद्रपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
किशोरकांत तिवारी हे मूळ बिहारमधील सासाराममचे रहिवासी होते. परंतु ते लंका सामनेघाट येथील महेश नगर कॉलनीमद्ये राहत होते. २०१७ मध्ये वाराणसीमध्ये त्यांनी रोटी बँक सुरू करून गरीबाचं पोट भरणं सुरू केलं. आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील लग्न कार्यात किंवा अन्य कोणत्या कार्यांमध्ये उरलेलं अन्य जमा करून शहरातील निरनिराळ्या भागात गरीबांना वाटत होते. काशीमध्ये कोणीही उपाशी राहू नये असा विचार करत त्यांनी लोकांच्या मदतीनं ताजं जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरही सुरू केलं होतं. रोटी बँकनं गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हजारो लोकांना दोन वेळचं जेवण देऊन पोट भरलं होतं.
काही दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपण चाचण्या केल्या असून टायफॉईड झाल्याचं सांगितलं होतं. तसंच लवकरच आपण ठीक होऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या पाच दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसंच दोन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.