हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:25 IST2025-10-14T12:24:24+5:302025-10-14T12:25:07+5:30
एका नर्सच्या हलगर्जीपणामुळे ६० वर्षीय महिला रुग्णाची प्रकृती गंभीर झाली आहे.

हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
लखनौमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) येथील एका नर्सच्या हलगर्जीपणामुळे ६० वर्षीय महिला रुग्णाची प्रकृती गंभीर झाली आहे. असा आरोप आहे की, नर्सने रागाच्या भरात चुकीची आयव्ही लाईन लावली, ज्यामुळे महिलेचा हात सुजला आणि काळा पडला. परिस्थिती आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे की, महिलेचा हात कापण्याची वेळ आली.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ येथील रहिवासी ६० वर्षीय केसरी देवी गेल्या महिन्याभरापासून केजीएमयूच्या ऑर्थोपेडिक्स विभागात दाखल आहेत. गेल्या आठवड्यात, रुग्णाच्या कुटुंबाने ड्युटीवर असलेल्या नर्सला आयव्ही लाईन लावण्याची विनंती केली, परंतु नर्सने वारंवार विनंती करूनही उशीर केला. जेव्हा कुटुंब तिच्या केबिनसमोर बसून वाट पाहत होतं, तेव्हा नर्स संतापली आणि रागाच्या भरात चुकीच्या जागी आयव्ही लाईन लावली. काही काळानंतर, महिलेचा हात सुजू लागला, परंतु नर्सने तक्रारींकडे दुर्लक्ष केलं.
जेव्हा हाताला सूज वाढली आणि नर्सची ड्युटी बदलली होती, तेव्हा नवीन आलेल्या नर्सने आयव्ही लाईन चुकीची लावल्याचं सांगितलं, ज्यामुळे इन्फेक्शन पसरलं. रुग्णाचा हात आता पूर्णपणे काळा झाला आहे. डॉक्टरांना भीती आहे की, जर इन्फेक्शन आणखी पसरलं तर महिलेचा हात कापावा लागू शकतो. कुटुंबाने संपूर्ण घटनेची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, केजीएमयू प्रशासनाने एक चौकशी समिती स्थापन केली आहे. प्रवक्ते प्राध्यापक के.के. सिंह म्हणाले, "चुकीच्या विगो इन्सर्टेशनमुळे हात काळा झाल्याची तक्रार मिळाली आहे. चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि दोषी आढळल्यास संबंधित नर्सवर कठोर कारवाई केली जाईल." या घटनेमुळे रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही तर रुग्णांच्या सुरक्षिततेबद्दलही गंभीर चिंता निर्माण होते.