केजरीवालांच्या गुगलीने भाजपचा उडाला त्रिफळा
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:49+5:302016-01-02T08:34:49+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या महत्त्वांकाक्षी सम- विषम योजनेला कितपत यश मिळाले यांचे अंतिम मूल्यांकन व्हायचे असताना प्रदेश भाजपा त्रिफळाचित झाली आहे.

केजरीवालांच्या गुगलीने भाजपचा उडाला त्रिफळा
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या महत्त्वांकाक्षी सम- विषम योजनेला कितपत यश मिळाले यांचे अंतिम मूल्यांकन व्हायचे असताना प्रदेश भाजपा त्रिफळाचित झाली आहे. लोकांनी या योजनेला व्यापक पसंती दर्शविल्यामुळे भाजपच्या नेत्यांना धक्का बसला आहे. नायब राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर हातावर हात ठेवण्याची पाळी आली.
प्रदूषणाविरुद्ध लढा देण्यासाठी देशात प्रथमच अशी योजना आणताना उफाळणारा संभाव्य जनक्षोभ पाहता मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, असा सवाल होता. जनतेकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे केजरीवालांनी स्वागत केले आहे; मात्र दिल्लीत कसा प्रतिसाद मिळणार याबाबत कुणीही खात्री देऊ शकत नाही. त्यामागची कारणे अगदी साधी आहेत. १४ लाख सार्वजनिक वाहने रस्त्यावर न धावल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले, तथापि येत्या दोन दिवसांत अनेकांनी सुटीचा आनंद घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. सोमवारपासून कदाचित गोंधळ आणि गदारोळात भर पडू शकते. १५ जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू होतील तेव्हा परिस्थिती आणखी बिकट होईल.
खरे चित्रही त्याचवेळी समोर येईल.या योजनेत २५ श्रेणींना सवलत दिली असल्यामुळे बदल घडवून आणले जातील. दिल्ली हे शहर गॅस चेंबर बनल्यामुळे न्यायालयानेही सध्या या योजनेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे, पण विशेषत: सार्वजनिक वाहतूक कोलमडल्यामुळे रस्त्यांवरील कोलाहलाला जन्म दिला जाऊ शकत नाही, असे न्यायप्रणालीतील एका ज्येष्ठ सदस्याने म्हटले.
काँग्रेस हताश
काहीही असो, केजरीवालांना लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात यश आले आहे. या सर्व घडामोडींकडे हताशपणे पाहण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. केजरीवालांना टक्कर देताना भाजपकडून मोठी घोडचूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपचे खासदार सत्यपालसिंग यांची सम क्रमाकांची कार दिल्लीत रोखली गेली पण या पक्षाला साधा विरोधही नोंदवता आला नाही.