'आप'च्या योगेंद्र यादव यांचा राजीनामा,केजरीवाल यांनी फेटाळला
By Admin | Updated: May 31, 2014 19:42 IST2014-05-31T18:04:51+5:302014-05-31T19:42:17+5:30
लोकसभा निवडणुकीत हरियाणा येथे 'आम आदमी पक्षा'च्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत योगेंद्र यादव यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांनी हा राजीनामा फेटाळून लावला आहे.

'आप'च्या योगेंद्र यादव यांचा राजीनामा,केजरीवाल यांनी फेटाळला
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली,दि. ३१ - लोकसभा निवडणुकीत हरियाणा येथे 'आम आदमी पक्षा'च्या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत 'आप'चे नेता योगेंद्र यादव यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मात्र 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. दरम्यान 'आप'चे हरियाणा युनिटचे अध्यक्ष नवीन जयहिंद यांनीही सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आपण राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिला असला तरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण काम करत राहू असे जयहिंद यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा येथे पक्षाला पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर योगेंद्र यादव व जयहिंद यांच्यात वाद सुरू झाले होते. पराभवाची जबाबदारी दोघेही एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करत होते. यादव हे गुरगाव येथून निवडणूक लढवली तर जयहिंद रोहतक येथून आपचे उमेदवार होते, मात्र दोघांनाही वाईट पराभव पत्करावा लागला. दिल्ली विधानसभेत 'आप'ला मिळालेल्या विजयानंतर हरियाणामध्ये पक्षाची लोकप्रियता वाढली होती. त्यानंतर पक्षाने हरियाणावर लक्ष केंद्रित करत तेथून मोठ्या उत्साहात निवडमूक लढली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत 'आप'चा राज्यात दणकून पराभव झाला.
दरम्यान 'आप'ने आता येत्या ऑक्टोबरमध्ये होणा-या हरयाणा विधानसभा निवडणुकांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान आपण पक्षाचा राजीनामा दिला नसून या सर्व निव्वळ अफवा आहेत, असे यादव यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. आपण अजूनही पक्षातच असून पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने काम करण्यास कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.